
मुंबईत आढळलेल्या 11 लाख 1 हजार 507 दुबार नावांच्या छाननीनंतर अखेर 1 लाख 68 हजार 350 दुबार मतदार आढळले आहेत. पालिकेने तंत्रज्ञानाचा वापर करून ही दुबार नावे वेगळी केली आहेत.
मुंबईत आढळलेल्या दुबार मतदारांमुळे जोरदार टीका होत होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने 11 लाखांवर नावांची छाननी मॅन्युअली न करता माहिती तंत्रज्ञान विभाग आणि एफ/उत्तर व एन विभागाने संयुक्तपणे राबवलेल्या विशेष मोहिमेत विशिष्ट फॉर्म्युल्यानुसार केवळ तीन ते चार तासांत हे काम केले. हेच काम मॅन्युअली करण्यासाठी किमान चार महिने लागले असते, असा दावाही पालिका प्रशासनाने केला आहे. या दुबार मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
माहिती तंत्रज्ञान विभागाचे मॉडेल
या प्रक्रियेसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेले Election Data Extraction Software वापरण्यात आले. या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने Excel Formula वापरून एकाच वॉर्डमध्ये दोन किंवा अधिक वेळा नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी, तसेच एकापेक्षा अधिक वॉर्डमध्ये नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली.






























































