
धर्म आणि विज्ञान यांच्यात कोणताही संघर्ष नाही. दोन्ही वेगवेगळ्या मार्गाने एकाच सत्याचा शोध घेतात हे सांगतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मातील संतुलन बिघडले तर विनाशाचे कारण ठरते असे वक्तव्य केले.
तिरुपती येथे आयोजित भारतीय विज्ञान संमेलनात सरसंघचालक भागवत बोलत होते. धर्माकडे अनेक वेळा गैरसमजातून ‘रिलिजन’ म्हणून बघितले जाते. परंतु धर्म म्हणजे एखादा ‘रिलिजन’ नाही. धर्म म्हणजे सृष्टी ज्या नियमानुसार चालते त्याचे विज्ञान आहे. कोणी मान्य करो अथवा न करो पण या नियमांच्या बाहेर कोणालाही कार्य करता येऊ शकत नाही. धर्मातील असंतुलन हे विनाशाचे कारण ठरते, असेही भागवत यांनी सांगितले.
वैज्ञानिक संशोधनात धर्माला काहीच स्थान नाही असे समजून विज्ञानाने धर्मापासून अंतर राखले. मात्र हा दृष्टिकोन चुकीचा आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात केवळ कार्यपद्धतीचा फरक आहे. मात्र दोघांचेही अंतरिम ध्येय सत्य शोधणे हे एकच आहे, असे भागवत म्हणाले.
मातृभाषेतून विज्ञान पोहचविले पाहिजे
या वेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मातृभाषेचा आग्रह धरला. विज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या देशातील भाषांचा वापर झाला पाहिजे. वैज्ञानिक ज्ञान जनतेपर्यंत मातृभाषेतून पोहचवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.


























































