
उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंह सेंगरला दिल्ली उच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. त्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून आज पीडितेच्या कुटुंबीयांसह महिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर उग्र निदर्शने केली.
कुलदीप सेंगरच्या जामिनावरून वादळ उठले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कालच अंजली पटेल आणि पूजा शिल्पकार या दोन महिला वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सीबीआयकडूनही आव्हान याचिका दाखल केली जाणार आहे. त्याच वेळी पीडितेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन सुरू झाले आहे. महिला कार्यकर्त्यांनी आज थेट दिल्ली उच्च न्यायालयावर धडक देऊन आंदोलन केले.
महिलांनी जामिनाचा निषेध नोंदवणारे आणि पीडितेसाठी न्यायाची मागणी करणारे फलक हातात घेतले होते. आंदोलनात पीडितेची आई सहभागी झाली होती. या वेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाला पोलिसांनी अटकाव केला. हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांनी पाच मिनिटांत आंदोलन न थांबवल्यास कारवाई करू, असा दम उद्घोषणा करत भरला. विरोध करायचा असेल तर जंतर मंतरवर जा, असा सल्लाही पोलिसांनी दिला. त्यावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतानाही अटकाव करण्यात आला, पण जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार, असे या वेळी महिला कार्यकर्त्यांनी ठणकावले.
आमचा हायकोर्टावरचा विश्वास उडाला!
सेंगरला मिळालेला जामीन हा आमच्यासाठी धक्का आहे. जामीन तत्काळ रद्द झाला पाहिजे. आमचा उच्च न्यायालयावरचा विश्वास उडाला असून सर्वोच्च न्यायालयातही न्याय मिळाला नाही तर देश सोडावा लागेल, अशा तीव्र भावना पीडितेच्या आईने व्यक्त केल्या.


























































