
तळीरामांची रात्री उशिरापर्यंत ‘बसण्याची’ सोय झाल्याने दारू तस्कर अॅक्टिव्ह होतील. त्यामुळे बेकायदेशीर दारू तस्करी होऊ नये, तस्करांची वेळीच नाकेबंदी व्हावी, बनावट दारूची विक्री होऊ नये याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वत्र ‘टाईट’ फिल्डिंग लावली आहे. दारूच्या कारभारावर या विभागाच्या पथकांनी करडी नजर ठेवली आहे.
तळीरामांना दारूची कमतरता पडू नये याकरिता दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. अशामध्ये दारू तस्कर आपला हात धुऊन घेण्याचा प्रयत्न करतात. नामांकित कंपनीच्या दारूच्या बाटल्यांमध्ये मिक्सिंग केलेली दारू भरून ती स्वस्तात विकण्याचा प्रयत्न करतात. भेसळ केलेली ताडी पण तळीरामांच्या माथी मारली जाते. यामुळे बनावट दारू प्यायल्याने त्रास होतो, शिवाय शासनाचा महसूल बुडतो. परिणामी याची राज्य उत्पादन शुल्क विभागाने दखल घेतली आहे.
बनावट दारू विक्रीतून शासनाचा महसूल बुडविणाऱयांचा मनसुबा उधळून लावण्याबरोबरच ग्राहकांना भेसळीची दारू विक्री होऊ नये याकरिता आम्ही विशेष लक्ष ठेवून आहोत. सर्वांनी नियमांचे पालन करावे, कायदा हाती घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये.
प्रसाद सुर्वे, अतिरिक्त आयुक्त (उत्पादन शुल्क)






























































