मस्तीत पण शिस्तीत जल्लोष करा; कायदा हाती घेणाऱ्यांची खैर नाही, थर्टी फर्स्टसाठी मुंबई पोलीस सज्ज

मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी)- सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. कुठे आणि कशाप्रकारे जल्लोष करायचा याचे प्लान आता ठरू लागले आहेत. एका बाजूला जल्लोषाची तयारी सुरू असताना त्यात कुठल्याही प्रकारे मिठाचा खडा पडू नये याकरिता मुंबई पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री नागरिकांच्या सुरक्षेसाठी अख्ख्sा पोलीस दल रस्त्यावर उतरणार आहे. हुल्लडबाजी, नको ते प्रकार करून कायदा हाती घेणाऱयांना तेव्हा माफी नसेल असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.

नववर्षाचे स्वागत सुरक्षित व निर्विघ्नपणे व्हावे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता मुंबई पोलीस विशेष काळजी घेत आहेत. थर्टी फर्स्टला वाहतूक विभागासह संपूर्ण पोलीस दलही बंदोबस्तासाठी शहरात तैनात असणार आहे. त्याचबरोबर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी पथके, बीडीडीएसची पथके,आरसीपी प्लाटून, होमगार्ड, पोलिसांची अतिरिक्त कुमक, साध्या वेशातील छेडछाडविरोधी, दहशतवादविरोधी पथके, महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पथकेदेखील तैनात असणार आहेत. महिला व बालकांच्या सुरक्षेला पोलिसांचे विशेष प्राधान्य असणार आहे.

नववर्षाच्या पहाटेपर्यंत जल्लोष करता येणार आहे. तेव्हा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, नववर्षाची सुरुवात वादावादीने किंवा अनुचित प्रकाराने होणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. सर्वांनी मनसोक्त जल्लोष करावा. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी आहोत; पण चुकीचे पाऊल टाकणाऱयांना सोडणार नाही असा पवित्रा पोलिसांचा असणार आहे.

तर कठोर कारवाई होणार

दारू ढोसून गाडय़ा चालविणारे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे, महिलांशी गैरवर्तणूक करणारे याचबरोबरच बेकायदेशीर दारू विक्री करणारे आस्थापना, नशेबाजांवर नजर ठेवण्यात येणार असून नियम मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पालिका, रेल्वेची मदत

मुंबई पोलीस हे रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाचीदेखील मदत घेणार आहेत. शिवाय पालिका प्रशासनाचीसुद्धा मदत घेण्यात येणार आहे. गर्दीच्या व आवश्यक ठिकाणी वीज नाही अशा ठिकाणी विजेचे खांब लावून प्रकाशव्यवस्था करण्यात येणार आहे.