
नाताळच्या सुट्टीत कुटुंबीयांसोबत फिरायला जाणाऱ्या नागरिकांची रविवारी लोकल प्रवासात गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेने अभियांत्रिकी कामांसाठी माटुंगा ते मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक घेतला आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. या काळात सर्व जलद लोकल धिम्या मार्गावरुन धावणार असल्याने लोकलच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
रविवारी सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा माटुंगा स्थानकातून धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित गाडय़ा शेवटच्या स्थानकावर 15 मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. ठाण्यापुढील जलद गाडय़ा मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 वाजेदरम्यान सुटणाऱया अप जलद मार्गावरील गाडय़ा मुलुंड स्थानक येथून अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या गाडय़ाही गंतव्य स्थानकांवर उशिराने पोहोचणार आहेत.
हार्बरवरही ब्लॉक
हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटीदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱया लोकल तसेच सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱया लोकल सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी स्थानक येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱया लोकल आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱया लोकल सेवा रद्द राहतील.
































































