
लष्करी सेवेतील एका जवानाच्या बाळाला जन्मतःच हृदयविकारासारख्या गंभीर आजाराचे निदान झाले. कोलकाता येथील लष्करी रुग्णालयात जन्मलेल्या या नवजात बालकाला पुढील उपचारासाठी तातडीने पुण्यातील आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिओ-थोरेंसिक सायन्सेस (एआयसीटीएस) या सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांच्या टीमने या बालकावर ‘एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन’ (ईसीएमओ) ही देशातील पहिली दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करत या बालकाला जीवनदान दिले. ही दुर्मिळ शस्त्रक्रिया लष्करी वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
कोलकाता येथील कमांड हॉस्पिटमध्ये उपचार घेत असलेल्या एका सैनिकाच्या पत्नीला वारंवार गर्भपाताच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे नव्या गर्भधारणेत बाळाला धोका उद्भवण्याची शक्यता होती. मात्र अशा परिस्थितीतही येथील डॉक्टरांनी हे वैद्यकीय आव्हान स्वीकारून दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली.
असे करते प्रणाली कार्य
‘एक्स्ट्रा कॉर्पोरियल मेम्ब्रोन ऑक्सिजनेशन’ ही प्रणाली प्रामुख्याने शरीरातील ऑक्सिजन आणि रक्ताभिसरणावर कार्य करते. त्यामुळे फुफ्फुस व हृदयाच्या कार्यात सुधारणा होते. शस्त्रक्रियेसंबंधित बालकावर उपचारासाठी याच प्रणालीचा आधार घेण्यात आला. जवळपास 90 तास या प्रणालीद्वारे बालकावर उपचार सुरू होते.

































































