
बेस्ट बससेवेमध्ये मायमराठीची अस्मिता जपण्यासाठी बेस्ट उपक्रम सजग झाला आहे. बससेवेमध्ये मराठी भाषेचा अचूक पद्धतीने वापर झाला पाहिजे. बेस्टच्या ताफ्यातील बस चालवणाऱ्या खासगी कंपन्यांकडून मराठीचा कुठल्याही प्रकारे अवमान होता कामा नये यादृष्टीने बेस्ट प्रशासनाने पाऊल उचलले आहे. त्यानुसार जर मराठी भाषेतील सूचनांच्या शब्दांमध्ये चुका आढळल्या तर खासगी कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
एकीकडे बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या घटत असून दुसरीकडे खासगी कंपन्यांच्या गाडय़ांचे प्रमाण वाढत आहे. ताफ्यात दाखल होणाऱया खासगी कंपन्यांच्या गाडय़ांमध्ये मराठी भाषेतील विविध सूचनांच्या शब्दप्रयोगांमध्ये अनेक चुका निदर्शनास येत होत्या. त्याकडे लक्ष वेधत ‘सुराज्य अभियान’ संस्थेचे प्रसाद मानकर व इतर मराठी भाषाप्रेमींनी बेस्ट प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते आणि व्याकरणातील चुका तातडीने दुरुस्त करण्याची विनंती केली होती.
महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीची प्रतिष्ठा जपणे आवश्यकच आहे. आम्ही बेस्ट प्रशासनाला बसमधील मराठी व्याकरणातील चुका लक्षात आणून दिल्या. त्यानंतर प्रशासनाने चुका दुरुस्त केल्या. प्रशासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी कायम सजग राहावे ही अपेक्षा आहे.
प्रसाद मानकर, मराठी भाषाप्रेमी
प्रत्येकी चुकीला 500 रुपयांचा दंड
बेस्ट बसमध्ये ‘संशयास्पद वस्तूंची माहिती पोलिसांना द्यावी’, ‘स्वच्छता राखा’, ‘तिकीट न घेता प्रवास करणे दंडनीय आहे’ आदी सूचना मराठी भाषेत ठळक शब्दांत लिहिणे बंधनकारक आहे. या सूचना अचूक लिहिणे आवश्यक असून यात आढळणाऱया प्रत्येक चुकीबद्दल खासगी बस ऑपरेटर कंपनीकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रवाशांकडून प्राप्त होणाऱया तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात येणार आहे.
































































