‘सवलती’च्या योजनांनी एसटी महामंडळाला तारले! मुंबई विभागात आठ महिन्यांत 57 लाख महिला आणि ज्येष्ठांचा प्रवास

मागील काही वर्षांत आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळाला सध्या ‘सवलती’च्या विविध योजनांनी ‘टेकू’ दिला आहे. एसटी महामंडळाच्या डोक्यावर अनेक देण्यांचा भार आहे. अशा परिस्थितीत एसटी कर्मचाऱयांचा पगार देणे मुश्किल बनले असताना ‘सवलती’च्या योजनांच्या परताव्याने महामंडळाला तारले आहे. महामंडळाच्या मुंबई विभागात या योजनांचा लाभ घेत गेल्या आठ महिन्यांत 57 लाख 29 हजारांहून अधिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून प्रवास केला.

एसटीच्या प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात सूट दिली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ अशा तीन श्रेणींमध्ये सवलत देण्यात येत आहे. ही सवलत लागू केल्यानंतर एसटी बसगाडय़ांकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. मुंबई विभागांतर्गत परळ, मुंबई सेंट्रल, कुर्ला, पनवेल, उरण या पाच एसटी आगारांतून प्रवास करणाऱया महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत 57 लाख 29 हजार 722 प्रवाशांनी सवलतीच्या योजनांचा लाभ घेतली आहे. त्यात महिला लाभार्थींची संख्या सर्वाधिक म्हणजेच 48 लाख 11 हजार 198 इतकी आहे. तसेच ‘ज्येष्ठ नागरिक’ योजनेचा 4 लाख 19 हजार 466 प्रवाशांनी लाभ घेतला, तर ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ पासचा वापर करून 4 लाख 99 हजार 58 प्रवाशांनी ‘लालपरी’तून प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आहे.

सवलत मूल्याचा परतावा वेळीच करा!

सरकारने मतदारांना खूश करण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासाच्या तिकीट दरात सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने संपूर्ण सवलत मूल्याची प्रतिपूर्ती वेळीच करणे आवश्यक आहे. मात्र सरकार महामंडळाला दर महिन्याला मागणीच्या तुलनेत कमी रक्कम देत आहे. त्यामुळे महामंडळाच्या थकवलेल्या रकमेचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सवलत मूल्याचा परतावा वेळीच करावा, अशी मागणी कर्मचाऱयांकडून केली जात आहे.