
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न या नागरी पुरस्कारांचा वापर सर्रास केला जातो, मात्र हे पुरस्कार पदव्या नाहीत. त्यामुळे विजेत्यांच्या नावापुढे त्यांचा वापर करणे अयोग्य असल्याचे न्यायमूती सोमशेखर सुंदरसेन यांच्या एकलपीठाने वकिलाला सुनावले.
सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या बैठकीशी संबंधित वादाच्या संदर्भात सहधर्मादाय आयुक्तांनी एक आदेश दिला होता. या आदेशाला डॉ. त्र्यंबक दापकेकर यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. 2014चे पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. शरद एम. हार्डीकर यांच्याशी संबधित एक याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर पद्मश्री असे नमूद केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यावर न्यायालयाने म्हटले की, नागरी पुरस्कारांच्या नावापुढे अशा प्रकारे पद्मश्री लिहिणे चुकीचे आहे. पद्मश्री आणि भारतरत्न हे केवळ पुरस्कार आहेत तर पदव्या नाहीत. त्यांचा वापर पुरस्कार विजेत्यांच्या नावापुढे किंवा मागे केला जाऊ नये, असेही न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला देतानाच न्यायालयाने हा निर्णय बंधनकारक असल्याचे नमूद केले.































































