
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला इंडिगो एअरलाईन्सच्या भोंगळ कारभारामुळे हजारो उड्डाणे रद्द झाली होती. परिणामी देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक वेठीस धरली गेली होती. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आज नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (डीजीसीए) अहवाल सादर केला आहे.
डीजीसीएने विमान सुरक्षेसंदर्भात नवी नियमावली लागू केली आहे. मात्र योग्य नियोजन न केल्यामुळे मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ टंचाई निर्माण झाली आणि इंडिगोची विमानसेवा जवळपास ठप्प पडली. सुमारे आठवडाभर हा गोंधळ सुरू होता. त्याचा लाखो प्रवाशांना फटका बसला. याप्रकरणी डीजीसीएचे सह-महासंचालक संजय ब्राह्मणे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने सखोल चौकशी करुन आज अहवाल सादर केला आहे. त्याची प्रत नागरी विमान वाहतूक मंत्रालयालाही देण्यात आली आहे. अहवालात नेमके काय म्हटले आहे, कोणत्या गोष्टींवर ठपका ठेवण्यात आला आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही.
इंडिगोच्या विमानात प्रवाशांचा गोंधळ
इंडिगोचे हैदराबाद येथून दरभंगाकडे जाणारे विमान खराब हवामानामुळे दुपारी कोलकाता येथे वळविण्यात आले. विमानात 100 पेक्षा जास्त प्रवासी होते. विमान अचानक कोलकाता येथे पोहोचल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला. पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय विमान कोलकात्याला नेण्यात आले, असा आरोप प्रवाशांनी केला.































































