
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील बेरोजगार एक लाख 34 हजार जणांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेत सामावून घेत त्यांच्या हाताला रोजगार दिला. गावातच हाताला रोजगार दिल्याने बेरोजगार तरुणांनी या निवडणुकीत महायुतीला कौल दिला खरा; पण आता ‘काम सरो, वैद्य मरो,’ अशी परिस्थिती झाली आहे. रोजगार दिलेल्या एक लाख 34 हजार युवा प्रशिक्षणार्थींना भाजप सरकारने घरचा रस्ता दाखवत तेथे नवीन वर्षापासून नवी भरती सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. शासनाच्या या कृतीचा, निर्णयाचा जाहीर निषेध करत जुन्याला न्याय न देता, नवीन भरती केल्यास शासकीय कार्यालयास टाळे ठोकू, आमरण उपोषण सुरू करू, असा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेचे नेते ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला.
तुकारामबाबा म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. सहा महिन्यांच्या या योजनेतील सहभागी मुलांना आपण आंदोलन केल्यानंतर पाच महिन्यांची मुदतवाढ दिली. युवा प्रशिक्षणार्थी यांची जिथे नेमणूक आहे, तेथेच त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी, या मागणीसाठी मागील वर्षभर आमचा लढा सुरू आहे. युवा प्रशिक्षणार्थीची या शासनाने चेष्टा लावली आहे. न्याय व हक्काच्या भाकरीसाठी ही मुले शासनाकडे हात जोडून लोकशाही मार्गाने आंदोलने करत आहेत. असे असताना त्यांच्यावर नागपूर येथे पोलिसांनी लाठीचार्ज केला. हा कसला न्याय, असा सवालही तुकारामबाबा महाराज यांनी उपस्थित केला.
सांगली, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह संपूर्ण राज्यात युवा प्रशिक्षणार्थी त्यांच्या हक्काच्या भाकरीसाठी आक्रमक झाले आहेत. शासनाने त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात; पण तसे दिसून येत नसल्याची खंत व्यक्त करत ह.भ.प. तुकारामबाबा महाराज म्हणाले, जुन्या एक लाख 34 हजार बेरोजगारांना रोजगार देण्यात, त्यांना न्याय देण्यास असमर्थ असलेले शासन येत्या एक जानेवारीला जुन्यांच्या जागी नवीन भरती करणार आहे. जुन्यांना न्याय न देता, नवीन भरती करत शासन बेरोजगार तरुणांची फॅक्टरी काढू पाहत आहे. जुन्यांच्या हाती ते प्रमाणपत्र दिले आहे. त्याचाही काही उपयोग नाही. कारण त्यावर तसा उल्लेख आहे. याबाबत आंदोलन करूनही भाजप सरकार लक्ष देत नाही. राज्यकर्ते भेट देत नाहीत, त्यामुळे राज्यकर्त्यांवर विश्वास कसा ठेवावा? असा सवालही त्यांनी केला.
बेरोजगारांची फॅक्टरी, मानधनही मिळेना
राज्यातील एक लाख 34 हजार युवा प्रशिक्षणार्थींना शासनाने नियुक्ती दिली. पाच महिन्यांची मुदतवाढ दिली; पण प्रत्यक्षात सेवा करणाऱयांना अद्यापि मानधन दिले नाही. सध्याच्या तरुणांना मानधन देण्यास टाळाटाळ करत असलेले शासन नवीन भरती करून बेरोजगारांची फॅक्टरी काढू पाहत आहे का, असा सवालही ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांनी व्यक्त केला.
























































