
जागतिक अॅथलेटिक्स गोल्ड लेबल मानांकन लाभलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 21 व्या आवृत्तीसाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आंद्रे डी ग्रासची आंतरराष्ट्रीय इव्हेंट ऍम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 18 जानेवारी 2026 रोजी होणाऱया या प्रतिष्ठत स्पर्धेत ग्रासची उपस्थिती मॅरेथॉनच्या जागतिक प्रतिष्ठsला नवी उंची देणारी ठरणार आहे.
आपल्या पिढीतील सर्वात यशस्वी आणि दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करणारा धावपटू म्हणून ओळख असलेला ग्रास हा जागतिक अॅथलेटिक्समधील एक आयकॉन आहे. वेगवान फिनिशिंग, मानसिक संयम आणि निर्णायक क्षणी चमकदार कामगिरी ही ग्रासची ओळख आहे. संघर्षातून उभा राहिलेला त्याचा प्रवास जगभरातील लाखो धावपटूंना प्रेरणा देणारा ठरला आहे. स्थानिक स्पर्धेत उधार घेतलेले स्पाइक आणि बास्केटबॉल शूज घालून धावताना ग्रास प्रथमच प्रकाशझोतात आला होता. हाच क्षण पुढे एका थोर ऍथलेटिक कारकीर्दीचा पाया ठरला. ग्रासच्या खात्यात आजपर्यंत सात ऑलिम्पिक पदके जमा आहेत. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने 200 मीटरमध्ये रौप्य, तर 100 मीटर आणि 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये कांस्यपदक पटकावले.






























































