
युती-आघाडीच्या वाटाघाटी… घासाघीस… आपल्या माणसाला उमेदवारी मिळणार की नाही याचा ताण… अर्ज दाखल करण्याची धावपळ आणि पुढील प्रचाराच्या आखणीची चिंता… हे सगळे क्षणभर मागे टाकून आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकमुखी आवाज दिला… पार्टी फर्स्ट!!!
निमित्त होते सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे. थर्टी फर्स्टचे. थर्टी फर्स्टमध्ये सेलिब्रेशन ठरलेलेच असते, पण यंदाचा थर्टी फर्स्ट वेगळा ठरला. हा थर्टी फर्स्ट कार्यकर्त्यांचा ठरला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आलेला हा थर्टी फर्स्ट यादगार ठरवण्याचा चंग प्रत्येक कार्यकर्त्याने बांधला होता. वेळात वेळ काढून प्लॅन ठरवले गेले. उमेदवारांनीही फारसा विचार न करता खिशात हात घातला आणि कार्यकर्त्यांना खूश केले. निवडणुकीचे दिवस असल्याने बहुतेक कार्यकर्त्यांनी आपापल्या शहरांत थांबणे अधिक पसंत केले. फारतर शहरापासून जवळ असलेल्या रिसॉर्ट, हॉटेलमध्ये बुकिंगकडे कल होता. अनेक ठिकाणी प्रचाराच्या मैदानात समोरासमोर उभे ठाकलेले कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून बसले, तर एकाच पक्षात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ग्लासाला ग्लास भिडवून नव्या वर्षाचे स्वागत केले.



























































