
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी स्वाभिमानी पक्षाचा पाठिंबा महाविकास आघाडीला असल्याचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज जाहीर केले आहे. याबाबत अधिकृत पत्रच त्यांनी जारी करण्यात आले आहे.
राज्यात सध्या महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि शहर भागातील सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांमुळे असंतोष वाढला आहे. सत्ताधारी पक्ष विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोपही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
शहरी जनतेच्या हक्कांसाठी लढा
महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देत शहरी जनतेच्या हक्कांसाठी लढा देण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. गरीब, शेतकरी, कष्टकरी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम पर्याय असल्याचा विश्वासही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे.





























































