मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ‘नाराजी’नामा सत्र, आणखी पदाधिकारी राम राम करण्याच्या तयारीत

नागपूर महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 16 (ड) मधील भाजपचे 80 हून अधिक कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनाला यामुळे धक्का बसल्याचे मानले जात आहे. पक्षातील असंतोषामुळे शहरातील इतर भागांतूनही आणखी राजीनामे येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इंडियन एक्सप्रेने याबाबत वृत्त दिले आहे.

प्रभागाचे माजी अध्यक्ष गजानन निशितकर यांनी सांगितले की आतापर्यंत एकूण 80 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले असून त्यात 45 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 2017 मध्येही आपल्याला उमेदवारी मिळाली नव्हती आणि यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जागा खुली असताना आपण दावेदार असल्याचा दावा करताना निशितकर म्हणाले की प्रभागातील सर्वाधिक म्हणजे 24 मतदान बूथ आपल्याकडे आहेत आणि कागदपत्रे तयार ठेवण्यासही सांगितले गेले होते, मात्र अखेर स्थानिक नसलेल्या महिला उमेदवाराला तिकीट देण्यात आले.

नागपूर शहर भाजपाध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की जे राजीनामे दिले जात असल्याचा दावा केला जात आहे ते प्रामुख्याने सामाजिक माध्यमांवर आहेत. आपल्याला वैयक्तिकरित्या लेखी राजीनामे मिळाले नसल्याने सध्या या बाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, माजी महापौर अर्चना देहांकर यांच्या घरीही नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यांच्या पती विनायक देहांकर यांनी भाजपमधून राजीनामा देऊन महापालिका निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्चना देहांकर आपल्या माहेरी गेल्या. विनायक देहांकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की 1984 पासून ते भाजपशी जोडलेले आहेत. त्या काळात हा भाग काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला असतानाही आपण तळागाळात पक्ष संघटना उभी केल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या पत्नीला पूर्वी तिकीट मिळाले होते आणि त्या विजयीही झाल्या होत्या, परंतु यावेळी प्रभाग 17 मध्ये स्थानिक कार्यकर्त्यांऐवजी बाहेरच्या लोकांना आणि माजी काँग्रेस उमेदवारालाही संधी देण्यात आल्याने आपण नाराज झालो, असे त्यांनी म्हटले.

देहांकर यांनी पुढे सांगितले की पक्षाने दिलेल्या चारही उमेदवारांपैकी एकही उमेदवार स्थानिक नाही, त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देत पक्ष वाढताना दिसत असल्याने निराशा झाली, असेही त्यांनी म्हटले. आपल्या अपक्ष उमेदवारीच्या निर्णयामुळे पत्नी नाराज असून त्यामुळे त्या माहेरी गेल्याचेही त्यांनी सांगितले.