
आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते केस अकाली पांढरे होण्यामागे केवळ बाह्य कारणे नसून, शरीरातील व्हिटॅमिन बी12ची कमतरता हे एक महत्त्वाचे कारण आहे. केसांचा नैसर्गिक रंग मेलॅनिन या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. शरीरात व्हिटॅमिन बी12चे प्रमाण कमी झाल्यास मेलॅनिनचे उत्पादन घटते आणि त्यामुळे केस काळ्याऐवजी हळूहळू पांढरे होऊ लागतात. व्हिटॅमिन बी12 हे लाल रक्तपेशी तसेच मज्जासंस्थेच्या कार्यासाठी अत्यावश्यक मानले जाते. याची कमतरता असल्यास केस कमजोर होतात आणि अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते.
तज्ज्ञ सांगतात की ताणतणाव, अपुरी झोप, असंतुलित आहार आणि बदललेली जीवनशैली यामुळेही ही समस्या अधिक वाढते. विशेषतः जंक फूडचे वाढलेले सेवन आणि पौष्टिक आहाराकडे होणारे दुर्लक्ष केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते.
व्हिटॅमिन बी12ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे तसेच मशरूम यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यासोबतच हिरव्या पालेभाज्या, फळे, प्रथिनेयुक्त आहार आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक असल्याचेही ते सांगतात. योग्य आहार, पुरेशी झोप आणि ताणतणावमुक्त जीवनशैली अंगीकारल्यास केस निरोगी राहतात आणि त्यांचा नैसर्गिक रंग दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.




























































