अंतराळाचे अंतरंग – विलक्षण खगोलीय वर्ष

>> सुजाता बाबर

2026 हे वर्ष खगोलीय दृष्ट्या समृद्ध व वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, ग्रह-युती, उल्का वर्षाव, धुमकेतू अशा खगोलीय घडामोडींमुळे आकाश निरीक्षण व अभ्यासाला अधिक वाव मिळणार आहे.

मानवाने आकाशाकडे कुतूहलाने पाहायला सुरुवात केल्यापासून सूर्य, चंद्र, ग्रह आणि ताऱ्यांच्या गती समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधुनिक खगोलशास्त्राने या निरीक्षणांना शिस्तबद्ध वैज्ञानिक चौकट दिली आहे. येणारे 2026 हे वर्ष खगोलीयदृष्टय़ा समृद्ध ठरणार असून सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, ग्रह-युती, चंद्राची पिधाने, उल्का वर्षाव आणि धूमकेतू यांमुळे आकाश निरीक्षणासाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

2026 मधील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 12 ऑगस्ट रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण. या दिवशी चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर अटलांटिक महासागर आणि उत्तर स्पेनवरून प्रवास करेल. आइसलँडजवळ खग्रास स्थिती सुमारे दोन मिनिटे अठरा सेकंद टिकेल. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राची रचना, ऊर्जेचे वहन आणि सौर वाऱ्यांचा उगम समजून घेण्यासाठी अशा ग्रहणांचे निरीक्षण खगोलभौतिकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते.

याच वर्षी 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण उत्तर व दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर परिसर, ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून दृश्यमान असेल. सुमारे 56 मिनिटे टिकणाऱ्या या ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या गडद छायेत पूर्णपणे प्रवेश करेल. पृथ्वीच्या वातावरणातून अपवर्तित झालेला सूर्यप्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो तांबूस-लाल रंगाचा दिसेल. वैज्ञानिकदृष्टय़ा ही घटना पृथ्वीच्या वातावरणीय संरचनेचा अभ्यास करण्यास उपयुक्त ठरते. याशिवाय 17 फेब्रुवारी रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण (अंटार्क्टिक) आणि 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण (आफ्रिका, युरोप व अमेरिका) अशी एकूण चार ग्रहणे 2026 मध्ये घडतील. सूर्याच्या बाबतीत 2026 हे वर्ष विशेष लक्षवेधी आहे. कारण पंचविसाव्या सौर पाच्या उच्चांकाशी निगडित सौर क्रिया अजूनही तीव्र स्वरूपात सुरू आहे. सौरडाग, सौर ज्वाला आणि सौर द्रव्यउत्सर्जन यांमुळे अवकाशीय हवामानात बदल घडू शकतात.

चंद्राच्या गतीच्या दृष्टीनेही 2026 महत्त्वाचा टप्पा आहे. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षीय पातळीशी सुमारे पाच अंश झुकलेली असल्यामुळे 18.6 वर्षांचे कक्षा-संपात प्रतिगामी चलन चक्र तयार होते. 2026 मध्ये चंद्राचा आकाशमार्ग उत्तर व दक्षिण दिशेकडे लक्षणीय प्रमाणात विस्तारलेला जाणवेल, ज्यामुळे चंद्राचे उदय-अस्त बिंदू आणि आकाशातील उंची हंगामानुसार बदलताना दिसतील.

2026 हे वर्ष चंद्र-ग्रह पिधानांचेही वर्ष आहे. चंद्र एकूण अकरा वेळा ग्रहांना आच्छादित करेल. बुध, शुक्र, मंगळ आणि गुरू यांचा यात समावेश आहे. विशेषत 6 ऑक्टोबर रोजी गुरू ग्रहाचे चंद्रपिधान उत्तर अमेरिकेसाठी निरीक्षणीय असेल. तसेच चंद्र सिंह राशीतील मघा, वृश्चिक राशीतील ज्येष्ठा आणि कृत्तिका तारकासमूह यांच्यावरून जाताना दिसेल. अशा घटना ग्रहांच्या कक्षा आणि चंद्राची गती अचूकपणे मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात. उल्का वर्षाव प्रेमींसाठी ययाती आणि मिथुन तारकासमूहांशी संबंधित उल्का वर्षाव विशेष ठरणार आहेत. कारण त्या काळात चंद्र अमावस्येच्या आसपास असेल. अंधाऱ्या आकाशात उल्का अधिक स्पष्टपणे दिसतील. याशिवाय C2/2025 R3 पॅनस्टार्स हा धूमकेतू वसंत ऋतूत दुर्बिणीतून पाहण्याजोगा ठरण्याची शक्यता आहे.

2026 हे अंतराळ संशोधनासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. नासाचे आर्टेमिस-2 दशकांनंतर मानवी चंद्रफेरी साध्य करेल. चीन चांग ए-7 व शुन्तियानद्वारे चंद्र-दक्षिण ध्रुव आणि विश्वाचा अभ्यास करणार आहे. युरोपियन स्पेस एजन्सीची प्लेटो, हेरा आणि बेपीकोलंबो मोहीम बहिर्ग्रह, ग्रहसंरक्षण आणि बुध ग्रह संशोधन विकसित करेल. भारत गगनयान उ1 व आदित्य-एल1द्वारे मानवी व सौर विज्ञान दृढ करेल.

एकूणच 2026 हे वर्ष केवळ दृश्य सौंदर्याचे नाही, तर सूर्य, चंद्र, ग्रह आणि पृथ्वी यांच्यातील सूक्ष्म खगोलीय नाते समजून घेण्याचे वर्ष आहे. खग्रास सूर्यग्रहणापासून चंद्राच्या पिधानांपर्यंत आणि उल्का वर्षावापासून धूमकेतूपर्यंत हे वर्ष आपल्याला आपण एका विशाल, गतिमान आणि नियमबद्ध विश्वाचा भाग आहोत याची पुन्हा जाणीव करून देत आहे.