
दर्जेदार नागरी सुविधा, मुबलक आणि स्वच्छ पाणी, खड्डेमुक्त रस्ते, मोकळी मैदाने, नाट्यगृहे, नवी वैद्यकीय महाविद्यालये, पूरमुक्त मुंबई, भूमिपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण, महिला, बेरोजगारांचे स्वावलंबन आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा ‘रोड मॅप’च आज शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी युतीच्या जाहीरनाम्यातून जाहीर झाला. सर्वसामान्य नागरिक, युवक, गरजू, बेरोजगार, महिला आणि सर्व गटांतील मुंबईकरांना डोळ्यांसमोर ठेवून हा वचननामा जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची करवाढ नाही की कोणत्याही शुल्कामध्ये वाढ नाही, मुंबईकरांना चांगल्या सुविधा आणि येत्या पाच वर्षांत मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्याचा उद्दिष्टच या जाहीरनाम्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ‘शिवशक्तीचा वचननामा’ विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारा ठरणार आहे.
कोळीवाडे, मच्छीमारांचे हक्क जपणार
मासेमारी करणाऱया कोळी गावांचा आणि मच्छीमार समाजाच्या सामायिक मालमत्ता, सुविधांचा महाराष्ट्राच्या किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात समावेश करून त्यांचे पर्यावरणीय हक्क निश्चित केले जातील.
महसूल विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, बीएमसी डीपी विभाग, समुदाय प्रतिनिधी यांच्या संयुक्त सीमांकन सर्वेक्षणानुसार कोळीवाडे व गावठाणांची अचूक आणि संपूर्ण सीमारेषा जाहीर करून जमिनीचे हक्क दिले जातील.
योग्य व शाश्वत विकास आराखडा (अ) धोरणात्मक उपायांद्वारे कोळी समाजाला विकास हक्क देण्यात येतील. तसेच हळूहळू विस्तार, पायाभूत सुविधा, कम्युनिटी लँड रिझर्व्ह, वारसा संवर्धन आदी माध्यमातून स्वयंविकसित घरे बांधता येतील.
मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच
महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करणाऱया शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱयांना तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार. मच्छीमार महिला विव्रेत्यांची नोंदणी करून त्यांना अर्थसहाय्य आणि नवीन परवान्यांची तरतूद – ज्यात समुदायांतर्गत परवान्यांच्या हस्तांतरणाची सोय समाविष्ट असेल.
बेरोजगारांना नोकरीची संधी
पालिकेतील रिक्त पदे भरणार. महापालिकेच्या मोठय़ा प्रकल्पांमध्ये इंजिनीअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनसाईट अप्रेंटिसशिप देऊन मराठी तरुण-तरुणींना कामाचा अनुभव देणार. मुंबईत रोजगारासाठी येऊ इच्छिणाऱया मराठी तरुण-तरुणींसाठी वसतिगृह उभारणार. महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सी.डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरू करणार.
पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, क्लिनिक, अॅम्ब्युलन्स
मुंबईच्या प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट वॉश, पेट अॅम्ब्युलन्स, पेट क्रेमेटोरियम यांची सोय उपलब्ध करून देणार.
हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमी तसेच इतर धर्मीयांच्या स्मशानभूमीत शाश्वत आणि आवश्यक त्या इम्प्रुव्हमेंट व विकास करणार.
पालिकेचे कॉलेज, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण
महापालिकेच्या शाळा कदापि बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही. दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार. पालिका शाळांचा उंचावलेला शैक्षणिक दर्जा, दहावीचा उत्तम निकाल आणि एसएससी बोर्ड, आयसीएसई बोर्ड, सीबीएसई बोर्ड, आयबी बोर्ड आदी अभ्यासक्रमांमुळे पालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यायला अक्षरशः रांगा लागत आहेत.
मुंबई पालिका मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, तेलुगू, तामीळ, कन्नड आणि इंग्रजी या आठ माध्यमांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत उपलब्ध करून देते. प्रत्येक शाळेत व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिऑलिटी तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून विद्यार्थ्यांना नव्या जगातील नव्या शैक्षणिक आव्हानांसाठी सज्ज करणार.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा फिटनेस आणि पोषक आहारावरही विशेष लक्ष देणार. महापालिकेच्या सर्व माध्यमांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘बोलतो मराठी’ हा हसत-खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरू करणार. पालिकेची वाचनालये ही अत्याधुनिक आणि डिजिटल केली जातील व प्रत्येक वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल.
चांगली मैदाने, उद्याने
छत्रपती शिवाजी महाराज पार्कसारखी चांगली मैदाने, उद्याने उभी केली जातील. जिथे नागरिकांना बसण्यासाठी कट्टे असतील. ती मैदाने भिंतींनी झाकली जाणार नाहीत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतील. तसेच प्रत्येक वॉर्डात एक आजोबा-आजी उद्यान असेल.
करमुक्ती व कर सवलत
500 चौरस फुटांपर्यंतच्या सर्व सदनिकांवरील मालमत्ता कर माफ केल्यामुळे तब्बल 14 लाख मुंबईकर फ्लॅटधारकांचे प्रतिवर्षी किमान 5 हजार ते 15 हजार वाचले आहेत. 700 चौ. फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करणार. कचरा विलगीकरण, गांडूळ खत प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जी तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱया सोसायटय़ांना मालमत्ता करात सवलत देणार. त्या प्रक्रियेसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी सोसायटय़ांना प्रोत्साहनपर एक लाख रुपयांची सबसिडी देणार. कचरा संकलनासाठी प्रस्तावित कर रद्द करणार.
पर्यावरणस्नेही सोसायटय़ांच्या पुनर्विकासासाठी बोनस एफएसआय: पर्यावरणस्नेही सोसायटय़ांच्या पुनर्विकासासाठी त्यांना अतिरिक्त चटईक्षेत्र देणार.
अत्याधुनिक मुंबई म्युझियम
सात बेटे ते देशाची आर्थिक राजधानी हा गेल्या तीनशे-साडेतीनशे वर्षांतील मुंबईच्या प्रगतीचा ऐतिहासिक आढावा, कापड गिरण्या ते आयटी हब हा प्रवास तसेच मुंबईला घडवण्यात मोलाचा वाटा असलेल्या उद्योजकांच्या योगदानाचे दर्शन घडविणारे अत्याधुनिक मुंबई म्युझियम उभारणार.
पालिका कर्मचाऱयांसाठी योजना
महानगरपालिका कर्मचाऱयांसाठी सध्या असणाऱया पाच लाखांच्या आरोग्य विम्याची रक्कम कुटुंबासह दहा लाख करणार. पालिका आणि बेस्ट कर्मचाऱयांच्या गृहनिर्माण संस्थांमधील इमारतींना पुनर्विकासाकरिता अधिक चटईक्षेत्र मिळावे यासाठी धोरण ठरवून राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेणार.
सफाई कामगारांसाठी पुढच्या 5 वर्षांत उर्वरित 16,000 घरे बांधणार.
महत्त्वाचे
अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करणार. प्रत्येक वॉर्डात मिनी फायर ब्रिगेड आणि फायर फायटिंग मोटरसायकल्स.
मुंबईत शताब्दी-गोवंडी, शताब्दी-कांदिवली, एम.टी. अग्रवाल-मुलुंड, भगवती-बोरिवली, राजावाडी-घाटकोपर येथे सुरू करणार.
रुग्णालयातील तसेच दवाखान्यातील डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शन दिलेल्या रुग्णांना जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून देणार.
ज्येष्ठ नागरिकांसाठी 24 बाय 7 हेल्थ-केअर कंट्रोल रूम आणि आरोग्य सेवा आपल्या दारी (हेल्थ-टू-होम) सेवा.
पालिका स्वतःच्या मालकीची रुग्णवाहिका आणि शववाहिनी सेवा सुरू करणार. पालिकेचे स्वतःचे सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय असेल.
मानखुर्द डम्पिंग ग्राऊंड येथील बायो-मायनिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान उभारणार.
समुद्राचे पाणी गोडय़ा पाण्यात रूपांतरीत करणारा निःक्षारीकरण प्रकल्प राबवून मुंबईकरांना सध्याच्या दरानेच मुबलक पिण्याचे पाणी.
टॉवरमध्ये राहणारा असो की वस्तीपाडय़ात, प्रत्येकाला स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार.
हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई बांधकाम पर्यावरणीय व्यवस्थापन योजना आणणार.
मिठी, ओशिवरा, पोयसर, दहिसर या चार नद्या आणि माहुल खाडी यांची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करून पर्जन्य जल व्यवस्थापन अधिक सक्षम करणार.
पूर्व वॉटरफ्रेट क्षेत्रातील-बीपीटीच्या सुमारे 1,800 एकरच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय उद्योजकता आणि वित्तीय केंद्र तसेच सागरी पर्यटन केंद्र.
कोस्टल रोड आणि पूर्व किनारपट्टी यांना जोडणाऱया रस्त्यांचे जाळे निर्माण करून मुंबईभोवती मास रॅपिड मोबिलिटीसाठी रिंगरोड ग्रिड उभारणार.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवन येथील भवानीमातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीच्या संयुक्त वचननाम्याची प्रत भवानीमातेच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेतले.
शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त वचननामा जाहीर करताना मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा महामार्गच सादर करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते.
































































