
मुस्तफिजूर रहमान वादानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) आक्रमक भूमिका घेत हिंदुस्थानात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपपासून दूर राहण्याचा थेट निर्णय घेतला आहे. जर एक खेळाडू सुरक्षित नसेल तर संपूर्ण संघालाच धोका आहे, अशी भूमिका घेत आगामी वर्ल्ड कपसाठी बांगलादेशचा संघ हिंदुस्थानात पाऊलही ठेवणार नसल्याची भूमिका बीसीबीने घेतली आहे.
बीसीबीच्या आपत्कालीन बैठकीत सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत केवळ आयपीएलच नव्हे तर टी-20 वर्ल्ड कपसाठीही बांगलादेश संघ हिंदुस्थानात येणार नाही. याआधी बीसीबीने सुरक्षा परिस्थितीबाबत आयसीसीने आणि बीसीसीआयने यांच्याशी पत्रव्यवहर केला होता; मात्र बैठकीनंतर निर्णय अधिक कठोर झाला.
बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनीही तीव्र संशय व्यक्त करत स्पष्ट निर्देश दिले की, टी-20 वर्ल्ड कपचे सामने श्रीलंकेत हलवावेत, यासाठी आयसीसीकडे अधिकृत मागणी करण्यात यावी. ‘जिथे एक खेळाडू सुरक्षित नाही, तिथे संपूर्ण संघ सुरक्षित असू शकत नाही,’ असा ठाम आणि आक्रमक संदेश त्यांनी दिला. बांगलादेशचे पहिले तीन सामने कोलकात्यात नियोजित होते. मात्र आता बीसीबी आयसीसीला औपचारिक पत्र पाठवून खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा ठामपणे आणि आक्रमकपणे मांडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुस्तफिजूर प्रकरणामुळे पेटलेला हा वाद आता केवळ आयपीएलपुरता न राहता हिंदुस्थानात होणाऱया टी-20 विश्वचषकावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरत आहे.


























































