विश्वासच बसत नाहीय की गिल वर्ल्ड कपबाहेर, हिंदुस्थानी क्रिकेटच्या अफाट क्षमतेवर पॉण्टिंगचा विश्वास

मला विश्वासच बसत नाहीय की गिल वर्ल्ड कप संघाबाहेर  आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या  15 सदस्यीय हिंदुस्थानी संघात गिलला स्थान न मिळाल्याबद्दल तीव्र शब्दांत आश्चर्य व्यक्त करत  गिलसारखा दर्जेदार फलंदाज संघाबाहेर राहणं हे एखाद्या खेळाडूचं अपयश नसून हिंदुस्थानी क्रिकेटची प्रचंड क्षमता, अनेक पर्याय आणि बेंच स्ट्रेंथ किती मजबूत आहे, याचंच ठळक उदाहरण असल्याचं पॉण्टिंगने स्पष्ट केले.

आयसीसी रिह्यूशी बोलताना पॉण्टिंग म्हणाला की, अलीकडच्या काळात गिलचा व्हाईटबॉल फॉर्म फार प्रभावी नसला, तरी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत गिलकडून पाहिलेली फलंदाजी अत्यंत दुर्मिळ आणि उच्च दर्जाची होती. मी त्याला इंग्लंडविरुद्ध खेळताना पाहिले आणि ते दृश्य माझ्या मनात ठसले. अशी फलंदाजी क्वचितच पाहायला मिळते, असेही सांगत पॉण्टिंगने गिलचा दर्जाही स्पष्ट केला.

विशेष म्हणजे आशिया कपसाठी शुभमन गिलची हिंदुस्थानी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती. तरीही टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याला संघात स्थान मिळू नये, हा निर्णय अनेक क्रिकेटप्रेमींना धक्का देणारा ठरला. अलीकडील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील अपेक्षाभंग करणारा फॉर्म गिलच्या आडवा आला. मागील वर्षात त्याने 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत केवळ 291 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेटही अपेक्षेपेक्षा कमी होता.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने टी-20 फॉरमॅटसाठी सध्याच्या कामगिरीलाच प्राधान्य देत गिलला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत गिलची कामगिरी आणखी ढासळली. पहिल्या तीन सामन्यांत त्याने अनुक्रमे 4, 0 आणि 28 धावा केल्या. अहमदाबाद येथे झालेल्या अखेरच्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान पायाच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला बाहेर बसावे लागले आणि त्याच्यासाठी अडचणी वाढल्या. पण गिलसारखा खेळाडू वर्ल्ड कप संघाबाहेर राहणे ही कोणत्याही एका क्रिकेटपटूची कहाणी नसून हिंदुस्थानी क्रिकेटची वाढलेली ताकद जगाला दाखवतेय.