वकिलांनी सत्तेसमोर सत्य बोलावे, न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी टोचले कान; मेघालय हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती

वकिलांनी सत्तेसमोर सत्य बोलावे, अन्यायाला आव्हान द्यावे व मुक्याचा आवाज बनावे, अशा शब्दांत गुरुवारी न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी कान टोचले. न्या. मोहिते-डेरे  यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निरोप भाषणात न्या. मोहिते-डेरे  यांनी वकिलांना मार्गदर्शन केले.

न्या. मोहिते-डेरे म्हणाल्या, वकिलांवर संविधानाची, सत्याची व न्यायाची जबाबदारी आहे. त्यामुळे वकिलांनी कोणतेही भय न बाळगता सत्य बोलायला हवे. सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहायला हवे. वकिलांची अखंडता व धाडस समाजावर परिणाम करते.

केवळ बाजू मांडण्यासाठी वकीलपत्र घेऊ नका तर सत्तेसमोर सत्य बोला. डगमगू नका. तुमचे सत्य विरोध व स्वातंत्र्य यातील फरक दाखवून देणारे ठरेल, असा सल्ला न्या. मोहिते-डेरे यांनी वकिलांना दिला.

लोकांचा न्यायावर विश्वास

न्यायमूर्ती म्हणून काम करताना मी केवळ कायद्याचा तर्क लावला नाही तर लोकांचा न्यायावर किती दृढ विश्वास आहे हे बघितले व हा विश्वास कायम ठेवण्यासाठी निकाल दिले. अनेक सुनावण्यांमध्ये मला लोकांच्या न्यायपालिकेकडून असलेल्या अपेक्षा दिसल्या, असेही न्या. मोहिते-डेरे यांनी नमूद केले.

न्यायपालिका हा व्यवसाय नाही

न्यायपालिका हा माझ्यासाठी कधीही व्यवसाय नव्हता. हे एक आव्हान होते. अधिकारांचे रक्षण व संविधानाची मूल्ये जपण्याची संधी होती, असेही न्या. मोहिते-डेरे यांनी सांगितले.