
महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळी सुरू असताना प्रचाराच्या गाडय़ांभोवतीच रंगतदार राजकारण घडल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूर भाजपच्या प्रचारासाठी सज्ज असलेल्या एलईडी व साऊंडने सुसज्ज अशा तब्बल 20 गाड्या थेट पुण्यात दाखल झाल्या असून त्या चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात गुंतल्याचे समोर आले आहे. हे समजताच नागपूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठले असून कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे ‘प्रचार पुणाचा आणि गाड्या पुणाच्या?’ याबाबत चर्चा रंगली आहे.
सध्या राज्यभर निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून सर्वच राजकीय पक्ष प्रचार वाहनांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. यासाठी अनेक ठिकाणी वाहने भाड्याने घेऊन करार केले जातात, मात्र वाढती मागणी आणि ‘जास्तीचा फायदा’ पाहता काही वाहनमालक एकाकडून पैसे घेऊन दुसऱ्याच्या प्रचारात सहभागी होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. एकीकडे प्रचाराचा आवाज वाढत असताना दुसरीकडे प्रचारगाडय़ांच्या ‘राजकीय स्थलांतरामुळे’ निवडणुकीच्या धावपळीत चर्चा रंगली आहे. आता या गाडय़ांचा शेवट कुठे लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी
नागपूर भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘छोटा हत्ती’ स्वरूपातील वाहने भाड्याने घेतली होती. एलईडी स्क्रीन, साऊंड सिस्टमसह सुसज्ज असलेल्या या गाड्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरण्यात येत होत्या, मात्र प्रचाराच्या धामधुमीत या गाडय़ांनी नागपूर सोडून थेट पुण्याची वाट धरल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे पुण्यात या गाड्या राष्ट्रवादीच्या प्रचारात वापरात असल्याचे लक्षात येताच नागपूरमधील भाजप पदाधिकारी तातडीने पुण्यात दाखल झाले. शुक्रवारी भाजप पदाधिकाऱयांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठून वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेतली. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेत असून संबंधित प्रचारगाडय़ांचा शोध घेऊन नेमका प्रकार काय आहे, याची पडताळणी सुरू केली आहे.






























































