
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिथे सभा घेतली त्या पिंपरीगावातच आमदार महेश लांडगे यांनी जाहीर सभा घेत पवार यांना एकेरी भाषेत प्रत्युत्तर दिले. मी वाकड्यात गेलो. तुमच्यात किती ताकद आहे ते पाहू देत. आमच्याशी लढाईची भाषा करायची नाही. तुम्ही कार्यक्रम करता, तर आम्ही काही बांगड्या भरल्या आहेत का? अशा भाषेत लांडगे यांनी अजित पवारांवर टीका केली.
भाजपच्या उमेदवारांसाठी आमदार लांडगे यांची पिंपरीगावात जाहीर सभा झाली. यावेळी लांडगे म्हणाले, अजित पवारांनी स्थानिक नेतृत्वाला मोठे होऊ दिले नाही. बाहेरून येऊन स्थानिकांमध्ये वाद लावून स्वार्थ साधला. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर आता एक झाले आहेत. त्यामुळे 128 उमेदवार त्यांना उभे करता आले नाहीत. त्यांनी डोळे मिटून आत्मपरीक्षण करावे. पिंपरी-चिंचवडमध्ये काय पाहिजे हे बारामतीला राहून कळणार आहे का? 25 वर्षे पालकमंत्री होता, काय केले? त्यांना शहरात केवळ मीच दिसतो. 30 वर्षे लोक यांच्या दारात उभे होते. आता त्यांना तिकिटे घेऊन शहरात वाटायला यावे लागते. शहरातील नेत्यांना पायापाशी ठेवले. पिंपरी-चिंचवड एकच असून, एक ठेवण्याचे सांगणारे तुम्ही कोण आहात? मी म्हणजे पिंपरी-चिंचवडकर असा त्यांचा समज झाला आहे. 2014 ला तुमच्या पक्षाच्या विरोधात अपक्ष लढलो आणि निवडून आलो. उधळलेला वारू रोखण्याची ताकद आमच्यात आहे. दात काढलेल्या वाघासारखी त्यांची परिस्थिती झाली आहे. माझ्या नादाला लागू नये. बाहेरून येऊन स्वाभिमानात हात घालायचा नाही. माझ्यावर आरोप केले की सगळेच बाहेर काढू, असा इशारा आमदार लांडगे यांनी दिला.





























































