वर्षभरात २३ लाख प्रवाशांचा प्रवास; उरण-नेरुळ-बेलापूर रेल्वे मार्गावर चार लाख प्रवासी वाढले

अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबई, ठाण्यातील मोठ्या प्रमाणात चाकरमानी वर्ग या ठिकाणी स्थायिक झाला असल्याने उरण – नेरुळ – बेलापूर या रेल्वे मार्गावर चार लाख प्रवाशांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षभरात या रेल्वे मार्गावरून २३ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून २०२४ मध्ये ही संख्या १९ लाख इतकी होती.

वाढती लोकसंख्या व विमानतळ कनेक्टिव्हिटीमुळे उरण – नेरुळ -बेलापूर रेल्वे मार्गिकेवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत या मार्गिकेवरून ४२ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यात २०२४ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत १९ लाख प्रवाशांची नोंद झाली होती. त्यानंतर २०२५ मध्ये या प्रवाशांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली असून जानेवारी ते डिसेंबरदरम्यान २३ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे.

१० फेऱ्या वाढवल्या
उरण – नेरुळ – बेलापूर रेल्वे मार्गिकेवर प्रवाशांची संख्या वाढल्याने या मार्गिकेवर लोकलच्या २० फेऱ्या वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार प्रवाशांची गैरसोय रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मार्गिकेवर १० लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच तरघर व गव्हाण या दोन स्थानकांवर लोकल थांबे ही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात या मार्गिकेवर चाकरमानी प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.