
अंबरनाथ, बदलापुरात भाजप आणि शिंदे गटाच्या वादात अवघे दोनचार नगरसेवक निवडून आलेल्या अजित पवार गटाला सत्तेची लॉटरी लागली आहे. नुकत्याच झालेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निकालानंतर भाजपने शिंदे गटाला सायडिंगला टाकत काँग्रेसचे १२ नगरसेवक पळवून सत्तेचा दावा केला होता. मात्र सत्तेचा हा सारीपाट आता उलटा-पुलटा झाला आहे. ‘ऑपरेशन लोट्स’ राबवणाऱ्या भाजपला शिंदे गटाने धोबीपछाड दिली असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे गट व भाजप राज्यात एकत्र सत्तेत असले तरी अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत दोघेजण समोरासमोर लढले. ५९ सदस्य असलेल्या नगर परिषदेत शिंदे गटाला २७ तर भाजपला १४ जागा मिळाल्या. काँग्रेसला १२ व राष्ट्रवादी अजित पवार गटाने चार जागा मिळवल्या. स्थानिक नेतृत्वाने अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली होती. काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींना डावलून परस्पर भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी १२ नगरसेवकांची तातडीने हकालपट्टी करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
आणि ‘त्यांचा’ गेम झाला
काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या त्या १२ नगरसेवकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. अंबरनाथच्या या नाट्यमय घडामोडी एवढ्यावरच थांबल्या नाही तर या घडामोडींना पुन्हा वेगळे वळण लागले असून शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपचा चांगलाच ‘गेम’ केला. शिंदे गटाने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडून आलेल्या चार नगरसेवकांना आपल्या सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कमळाबाई व शिंदे गट यांच्या वादात अजित पवार यांनी मात्र आपली राजकीय पोळी भाजून भाजपला डिवचले आहे































































