
डोरिस ड्योरी ही एक जर्मन लेखिका, सिनेदिग्दर्शक आणि निर्माता. सिनेक्षेत्रातील कामाबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजली गेलेली डोरिस तिच्या लेखनाबद्दलही तितकीच प्रसिद्ध आहे. लघुकथा आणि ललित लेखन हे या डोरिसच्या लेखनशैलीवर वाचकांचे विशेष प्रेम दिसून येते. स्त्री-पुरुषांचे व्यक्ती-स्वभावानुसार बदलते दृष्टिकोन आपल्या लेखनातून चपखलरित्या डोरिसने मांडले आहेत. हलक्याफुलक्या शैलीतून सामाजिक टिप्पणी करणारे तिचे लेखन म्हणूनच तिच्या चाहत्यांना भावते. तिच्या लेखनातील ही सहजसुंदरता पहिल्यांदाचा मराठीभाषिक वाचकांना अनुभवयाला मिळत आहे, तिच्या ‘जगणं… लिहिणं… श्वास घेणं…’ या अनुवादित पुस्तकातून.
अभिषेक धनगर यांच्या वॉल्डन पब्लिकेशनद्वारे प्रकाशित या पुस्तकाचे लेखक-अनुवादक आहेत साकेत देखणे. थेट जर्मन भाषेतून मराठीत भाषांतरित केलेले आणि इंग्रजीसह कोणत्याच भाषेत अजून भाषांतरित न झालेलं हे अप्रतिम पुस्तक पहिल्यांदा मराठीत प्रकाशित झाले आहे. डोरिस डय़ोरीच्या मते अधिक उत्कटपणे जगण्याचा मार्ग म्हणजे लिहिणं आणि लेखन म्हणजे स्तब्ध, शांत होणं, जाणीवपूर्वक आठवणी जागवणं आणि जग आणखी चांगल्या पद्धतीने जाणून घेणं. हाच अनुभव वाचकांना देणारं हे पुस्तक आहे.






























































