
>> श्रीकांत आंब्रे
ज्येष्ठ कवी डा. सुनील सावंत यांच्या वैविध्यपूर्ण कवितांचा ‘सूर्य दिसत राहील तोपर्यंत…’ हा काव्यसंग्रह म्हणजे कवीच्या चिंतनशील व सजग व्यक्तिमत्त्वाचा विलोभनीय आविष्कार आहे. प्रेम, प्रेयसी, गाव, निसर्ग याबरोबरच सभोवतालचे सामाजिक-राजकीय दाहक वास्तव, कामगारांवर होणारा अन्याय, सामान्य माणसाची होणारी कुतरओढ, समाजाच्या मानगुटीवर बसलेले जाती-पाती-धर्म आणि विषमतेचे भूत, त्यातून येणारी उद्विग्नता हे पाहून तो अस्वस्थ होत असला तरीही मनात दाटलेली सूर्यप्रकाशाची आश्वासक जाणीव कुठेतरी त्याला दिलासा देते. भयाण वास्तवाकडे पाहण्याची भेदक नजर त्याच्याकडे आहे. तरल संवेदनांचा स्पर्श असलेली सौंदर्यदृष्टीही आहे. समस्त स्त्रीजातीविषयी असलेली आदराची भावना, स्त्राrचे ‘स्वत्व’ जपण्याची समाजाला जाणीव करून देण्याची वृत्ती, तिच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध त्याच्या मनात खदखदणारा असंतोष या कवितेतून विविध रूपांत व्यक्त होतो. त्याच्या कवितेतील स्त्राr ही शोभेची वस्तू नाही तर समतेच्या नव्या युगाची प्रतिनिधी आहे. म्हणूनच ती म्हणते-
तुझा हात हवा, तुझी साथही
पण मला अबला समजू नकोस
मीसुद्धा तुझ्या खांद्याला खांदा लावून चालतेय!
त्याचे कोकणातील गाव, तिथले जीवन, निसर्ग त्याच्या रोमारोमात भिनलेला दिसतो. बदलणारे ऋतू टिपणारे त्याचे मन कवितेतून बोलके होते. ‘गंध’ या भावस्पर्शी कवितेत ते कसे उमाळय़ाने दाटून येते ते पाहण्यासारखे आहे.
सोनटक्क्याचा गंध
अगदी जवळून सरकला
म्हणून मी वळून पाहिलं
तर… ती तूच होतीस
हल्ली मी वाट बघत असतो
दरवर्षी येणाऱ्या पावसाची!
त्य्या दृष्टीने त्याच्या ‘तुझ्या रूपाने’, ‘मी, तू आणि विश्व’, ‘पालापाचोळा’, ‘एक झाड’, ‘नवीन आशा’, ‘मृगसरी’, ‘मी अन’, ‘उषा’, ‘सृष्टी’, ‘घरटे’, ‘युगांची ओझी’, ‘कोकणातील एका म्हातारीचे गीत’, ‘अन्वय’, ‘पहाटस्वप्न’, ‘गर्भाशयाच्या उदरात’, ‘शोधत होता’ या कविता उल्लेखनीय आहेत.
मात्र त्याची संवेदनशील लेखणी लोकशाहीवर होणारे अत्याचार पाहून धारदार शब्दशस्त्रांचे वार करत जाते.
‘अमावस्या’ या कवितेत तो म्हणतो-
तू नोकरी करशील तिथे भ्रष्टाचार शिकवतील
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना नष्ट करतील
व्यक्तिनिष्ठ संबंधांना नेहमी रेशमी न्याय देतील
अमावस्येच्या रात्री चंद्राचीही साक्ष घेतील
त्याच्या मालवणी कविताही उत्तम शब्दचित्रांसारख्या आहेत. कोकणी माणसाची सुखदु:ख, व्यथा, संताप, लुबाडणूक, फसवणूक तो प्रभावीपणे व्यक्त करतो.
कालेजच्या आठवणीत तो रमतो. तिथली अव्यक्त प्रेमाची मैत्री मनात रंजी घालू लागते. आधुनिक संगणक युगाशी जुळणारे एक नवे नाते मग कवितेतूनही बोलू लागते. पहाटे झोपेतून जाग्या होणाऱ्या मुंबईचे वर्णनही मनाला भिडणारे आहे. तो म्हणतो-
तशी मुंबई कधी झोपतच नाही
गोलपीठा रात्रभर जागाच असतो
म्हणून मुंबईचे सगळे व्यवहार सुरक्षित चालतात
यात एक कविता मात्र खूप वेगळी, पुरुषांच्या मनातील वेदनांवर हळुवार फुंकर घालणारी आहे.
एक माहेर पुरुषांसाठी
असावं मायेचं
त्यांचं मन हलकं करणारं, अश्रू पुसणारं!
त्याचे अश्रू पुसणारी एक आई असते
मोठं होईपर्यंत सावली असते पावलोपावली
आणि मग मोठं झाल्यानंतर कुणीच नसतं
पुरुषांच्या मनाचे पापुद्रे अलगद उलगडणारं
नव्या वर्षाचं स्वागत तो करतो तेही सावधपणाने-
मावळतीचे करार अतिरेक्यांचे वार
यात सारी वर्षे संपली
जाग आली तेव्हाही
आयोगांची सुनावणी अपूर्ण होती
म्हणूनच शोध घेण्यासाठी
नवीन आयोगाची नेमणूक झाली
तुम्ही आम्ही साथी दोन दिवसांचे
तरीही वैमनस्य घेऊन चालणारे
येणाऱ्या अपरिचित सहस्रकाचे
स्वागत करूया केवळ माणूसधर्माने
साध्या, सोप्या भाषेतील या आशयगर्भ कविता कवीचं आंतरिक दु:ख व्यक्त करणाऱ्या तसंच आश्वासकही आहेत. वाचकांना अंतर्मुख करण्याची ताकद त्यांच्यात निश्चित आहे.
सूर्य दिसत राहील तोपर्यंत… (काव्यसंग्रह)
कवी : डा. सुनील सावंत
प्रकाशक : वंदना प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : 128, ह मूल्य : रुपये 250/-































































