घंटा फरक पडतो! मुंबईच्या विकासावरून आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

मुंबईतील निवडणुकीस अवघे पाच दिवस उरले असतानाही भाजपकडे मुंबईसाठी कोणताही ठोस अजेंडा, विकासाची दृष्टी किंवा जाहीरनामा नसल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजप मुंबईसंबंधी ठोस मुद्द्यांवर बोलण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारला सीमापार घुसखोरी रोखण्यात आलेल्या अपयशासारख्या अमूर्त विषयांवर बोलत आहे, मात्र शहराच्या मूलभूत प्रश्नांवर मौन बाळगत आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच शेवटच्या क्षणी ‘2047’, ‘विकसित भारत’ अशा काल्पनिक संकल्पनांवर आधारित, अवास्तव आकड्यांचा जाहीरनामा आणण्याची त्यांची शक्यता आहे. गेल्या चार वर्षांत राज्यातील भाजप सरकारने मुंबईची लूट केली. आम्ही आमचे काम, केलेली विकासकामं, जाहीरनाम्याची अंमलबजावणी आणि भविष्यासाठीची दृष्टी जनतेसमोर मांडली आहे, मात्र भाजपला मुंबईची काहीही पर्वा नाही. इतर शहरांप्रमाणेच जिथे भाजपकडे संपूर्ण सत्ता असते तिथे लोकांना त्रास सहन करावा लागतो आणि मंत्री म्हणतात, ‘घंटा फरक पडतो’, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.