
फलटण तालुक्यातील बरड गावचे सुपुत्र तथा 115 इंजिनिअर रेजिमेंटचे जवान नायक विकास विठ्ठलराव गावडे यांना सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. याबाबतची माहिती समजताच बरड गावासह फलटण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
नायक विकास गावडे हे भारतीय लष्कराच्या 115 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मोहिमेअंतर्गत ते शांतता राखण्याच्या जबाबदारीवर कार्यरत असताना कर्तव्य बजावत असतानाच त्यांना वीरमरण आले. देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या या शूर जवानाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. शहीद जवान नायक विकास गावडे यांच्या पश्चात दोन वर्षांची मुलगी, पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
शहीद जवान नायक विकास गावडे यांचे पार्थिव उद्या (दि. 11) सकाळपर्यंत त्यांच्या मूळगावी बरड (ता. फलटण) येथे पोहोचणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली. शहीद जवान विकास गावडे यांच्या पार्थिव आगमनाची व अंत्यसंस्काराची प्रक्रिया प्रशासनाकडून समन्वयाने पार पाडली जाणार आहे, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.






























































