जैशकडे हजारो आत्मघातकी बॉम्बर आहेत…; मसूद अझहरची पुन्हा एकदा दर्पोक्ती

पाकिस्तानकडून हिंदुस्थानविरोधी अनेक कुरापती करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याने आता जगासमोर उघड झाले आहे. त्यातच आता पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा एक ऑडिओ मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात मसूद हिंदुस्थानविरोधात दर्पोक्ती करताना दिसत आहे. या मेसेजमध्ये मसूद अझहर दावा करत आहे की, त्याच्या संघटनेकडे हजारो आत्मघातकी बॉम्बर आहेत, जे कधीही हल्ला करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. यानंतर आता हिंदुस्थानातील सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली आहे.

या ऑडिओमध्ये शहीदचा उल्लेख करत मसूद अझहर म्हणाला की त्याचे दहशतवादी सांसारिक सुखसोयी किंवा वैयक्तिक लाभ मागत नाहीत. संघटनेच्या दहशतवाद्यांची संपूर्ण संख्या सार्वजनिक केली तर जगभरातील माध्यमांमध्ये खळबळ उडेल, ज्यामुळे जैश-ए-मोहम्मदकडे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित दहशतवादी असल्याचे स्पष्ट होईल.

दहशतवादी संघटना दबावाखाली असताना असे ऑडिओ संदेश अनेकदा प्रसिद्ध केले जातात. पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या अनेक तळांवर हिंदुस्थानने अलिकडेच केलेल्या हल्ल्यात डझनभर सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर हा संदेश समोर आला. हे मसूद अझहरच्या मानसिक स्थितीचे आणि निराशेचे लक्षण मानले जात आहे. त्यामुळे असे संदेत प्रसारित केले जात असल्याचे मत सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मसूद अझहर २०१९ पासून सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. त्याच वर्षी बहावलपूरमध्ये त्याच्या लपण्याच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तो लपून बसला आहे. तथापि, त्याच्याशी संबंधित ऑडिओ आणि मजकूर संदेश वेळोवेळी सोशल मीडियावर येत राहतात. अशा संदेशांचा मुख्य उद्देश भीतीचे वातावरण निर्माण करणे आणि संघटनेच्या समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी त्यांची ताकद दाखवणे आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.