मद्याचे घोट आणि बिर्याणीने भरते पोट, सोबत महागड्या वस्तूंचीही भेट; चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पैशांच्या बाजारावर प्रचाराचा खेळ

महानगरपालिकेसाठी अवघ्या चार दिवसांनी मतदान होणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि स्थानिक पातळीवर सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र निवडणुकीच्या प्रचारात रस्ते, पाणी, पथदिवे, उद्याने, भुयारी गटार, शिक्षण इत्यादी मुद्दे प्रचारात मागे पडले आहेत. उमेदवारांकडून या मुद्दय़ांवर भर दिला जात नसून मांसाहारी जेवण, कार्यक्रमांसाठी रोख देणग्या, झोपडपट्टय़ांमध्ये पैसा, भेटवस्तूंचे वाटप इत्यादींवर भर दिला जात आहे. यात भरीस भर म्हणजे काही उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील मद्यालये तसेच हॉटेल्स मतदारांसाठी खुली केली असून मतदारांच्या घरी अनेकांनी तर जेवणाचा डबाच सुरू केला आहे.

निवडणुकीच्या प्रचाराला आता जेमतेम तीन दिवस शिल्लक आहेत. अखेरच्या टप्प्यातील प्रचारात कोण बाजी मारणार, याची स्पर्धा सुरू आहे. मात्र ही स्पर्धा मुद्दय़ांवर नसून आर्थिक क्षमतेवर सुरू आहे. अनेक कोटय़धीश उमेदवार या वेळी रिंगणात आहेत. त्यांनी प्रभागात मतदारासाठी मांसाहारी जेवणाची सोय केली आहे. भाजपच्या एका महिला उमेदवाराने प्रभागातील 10-12 मतदारांच्या समूहाला दररोज पाच ते सात किलो बिर्याणी दररोज पाठवणे सुरू केले आहे. शिंदेंच्या उमेदवाराकडून दररोज जेवणाचे डबे पाठवण्यात येतात. काहींनी शहरातील मद्यालये आणि हॉटेल्स मतदार व कार्यकत्यांसाठी खुली केली आहेत. तेथे मद्यप्रेमींची गर्दी होताना दिसते. या आमिषाला सुशिक्षित आणि उच्चविद्याभूषित मतदारही बळी पडलेला दिसतो.

साहित्य वाटपावर जोर

अनेक उमेदवारांनी साहित्य वाटपावर भर दिला आहे. प्रभागातील क्रीडा मंडळांना खेळांचे साहित्य भेट देण्यात आले आहे. समाज मंदिरांना रोख देणगी, तर कीर्तन व योग मंडळांना ध्वनीप्रेक्षपकासह इतर साहित्य दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही त्यांच्या गरजेनुसार साहित्य वाटप करण्यात येत आहे. 

चंद्रपुरात कोटय़धीश उमेदवार किती?

चंद्रपूर महानगरपालिकेच्या आखाडय़ात 451 उमेदवार आहेत. त्यापैकी 53 उमेदवार कोटय़धीश आहेत. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रातून ही माहिती मिळाली. यापैकी बहुतांश उमेदवार हे भाजपशी संबंधित आहेत. याशिवाय 13 उमेदवार असे आहेत, ज्यांच्याकडे एक रुपयादेखील नाही. या उमेदवारांनी जंगम व स्थावर मालमत्ता निरंक असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.