6000 कोटींचा खर्च, तरीही शहराची बकाल अवस्था; या खर्चाचा पंचनामा हाच आमचा जाहीरनामा – बबनराव थोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड शहराची झालेली बकाल अवस्था, वाहतुकीची प्रचंड कोंडी, पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाणी,रस्त्यावर पडलेले खड्डे, खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची दुरावस्था, आरोग्य सेवेचे तीनतेरा, गेल्या वीस वर्षात सहा हजार कोटी खर्च होवूनही नांदेडची झालेली दुरावस्था हे पाहता या विकास कामाचा पंचनामा हाच आमचा जाहीरनामा आहे. या सर्व कामांची युध्दपातळीवर चौकशी करणे गरजेचे असून महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बळासाहेब ठाकरे) ३५ शिलेदारांना जनता निवडून देईल, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

नांदेडच्या हॉटेल सिटी प्राईडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला बबनराव थोरात संबोधित करीत होते. त्यांनी नांदेड शहराच्या बकाल अवस्थेवर भाष्य केले. गेली अनेक वर्ष माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सत्ता आहे. गेल्या वीस ते बावीस वर्षात या शहरावर सहा हजार कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. मात्र शहरातील परिवहन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, मनपाच्या शाळा, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, रहदारीचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न या सर्व बाबीवर आजही नांदेडकरांचे प्रश्नचिन्ह असून, नांदेडकरांचा श्वास गुदमरलेला आहे. धनदांडग्यांच्या हव्यासापोटी मोठीमोठी कामे करण्यात आली. मात्र शहराची झालेली बकाल अवस्था संतापजनक असल्याचा आरोप त्यांनी केला.

गोदावरी नदीचे प्रदूषण व सभोवताली असलेल्या मंदिराच्या परिसरात ड्रेनेजचे पाणी नदीत सोडल्याने निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. एज्युकेशन हबची घोषणा करुन नांदेडकरांना भव्यदिव्य स्वप्न दाखवत विकसित नांदेडचा नवा चेहरा निर्माण करण्याची भाजपाची घोषणा ही केवळ धुळफेक असल्याचे सांगून सहा हजार कोटी विकास कामांचा पंचनामा हाच आमचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी सांगून शिवसेनेचे प्रामाणिक व कष्टाळू ३५ उमेदवार नांदेडकरांच्या पसंतीला उतरतील आणि जनतेची सेवा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी धनदांडग्यांना जोपासण्यासाठी शहर विकासाची स्वप्ने दाखविणार्‍या व अनेक वर्ष मनपाची सत्ता भोगणार्‍या पूर्वीच्या काँग्रेस व आताच्या भाजपाला जनता धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना विकासाचे गाजर दाखवून लोकांची दिशाभूल करणार्‍या मंडळींना आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे.