
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा सायंकाळी थंडावल्या आहेत. मात्र, निवडणूक प्रचारात एकमेकांवर केलेले आरोप, मटनाचा विषय, एकमेकांवर केलेली कुरघोडी, शिंदे गटात झालेले बंड, आमदारातील गटबाजी यामुळे या निवडणुकीत कुणावर संक्रांत येणार हा आता चर्चेचा विषय ठरत आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या प्रचार आता संपला आहे. पंचरंग लढतीत या निवडणुकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षात प्रमुख लढत होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, खासदार नागेश पाटील, अॅड.प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, इम्रान प्रतापगढी, असदोद्दीन ओवेसी, सिध्दराम मेहत्रे, उदय सामंत आदीच्या प्रचारसभा झाल्या.
निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यानंतर विकास कामे आणि त्यांचा गाजावाजा, एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप, शिवसेना निर्माण झालेले वादळ, शिंदे गटाच्या आमदारात पडलेली फुट, नांदेड उत्तर आणि दक्षिण आमदारांची वेगवेगळी भूमिका या सर्व पार्श्वभूमीवर ही निवडणूक गाजली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या रोज खा मटन आणि कमळावर दाबा बटन या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. तर राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षात प्रदेश सरचिटणीस जीवनराव घोगरे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निवडणुकीच्या प्रचारात चर्चेचा विषय ठरला. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यावरुन झालेले टिकास्त्र, काँग्रेसच्या काळात झालेल्या कामाचा पर्दाफाश, सहा हजार कोटींचा खर्च करूनही बकाल झालेले शहर, चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांनी एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप, लिडर ते डिलर या वक्तव्याची चर्चा यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. दुसरीकडे शिवसेनेने विकास कामाच्या मुद्यावर निर्माण केलेले वातावरण, प्रामाणिक चेहर्यांचा मतदारांच्या भेटी घेवून प्रचार रॅलीव्दारे केलेला आपुलकीचा प्रचार यामुळे या निवडणुकीत रंगत आली.
केलेल्या कामाचा पाढा वाचून पाठ थोपटून घेणार्या भाजपा नेत्यांचा शिंदे गटाने घेतलेला खरपूस समाचार चांगलाच रंगला. बकाल झालेले शहर, दुर्गंधीयुक्त पाणी, गोदावरीचे जलप्रदूर्षण, रस्त्याची झालेली दुरावस्था, अमृत योजनेचा बट्याबोळ यामुळे प्रचारात सदरचे मुद्दे वैशिष्ट्येपूर्ण ठरले. घराणेशाही, भ्रष्टाचार, गैरव्यवहार यावर काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी केलेला प्रहार आदी मुद्देही चर्चेचे ठरले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिंदे गटाकडून उत्तरेतून स्वतंत्र निवडणूक तर नांदेड दक्षिणमध्ये आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादीशी केलेली युती यामुळे मतदार संभ्रमात पडले आहेत. या निवडणुकीत ४९१ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणार्या या निवडणुकीत मतदार राजा कुणावर संक्रांत आणणार हे आता लवकरच समजणार आहे.



























































