संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाळणा हलला, भारती सिंहिणीने दिला तीन छाव्यांना जन्म

बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. भारती या सिंहिणीने तीन छाव्यांना जन्म दिला आहे. मानस नावाच्या सिंहापासून झालेले हे तीनही छावे निरोगी असल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने वन्यजीव संवर्धन व जनजागृतीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. तीनही मोठय़ा जंगली मांजरी वाघ, सिंह आणि बिबटे एकाच राष्ट्रीय उद्यानात पाहण्याची व त्यांच्याविषयी माहिती मिळवण्याची संधी देणारे हे भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. सध्या उद्यानामध्ये 13 वाघ आणि 5 सिंह पिंजऱयात ठेवलेले असून, उद्यान परिसरात 50 हून अधिक बिबटे मुक्त संचार करत आहेत. त्यामुळे जगातील सर्वाधिक बिबटय़ांची संख्या असलेल्या ठिकाणांपैकी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एक असल्याचा मान मिळाला आहे.

11 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास या तीन छाव्यांचा जन्म झाला. त्यांचे मातापिता असलेले भारती आणि मानस यांना नवी दिल्लीतील पेंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या वन्यप्राणी अदलाबदल कार्यक्रमांतर्गत गुजरातमधील जुनागढच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयामधून मुंबईत आणण्यात आले होते.

z मागील वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या 16 तारखेलाही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मानसी नावाच्या सिंहिणीने एका मादी छाव्याला जन्म दिला होता. तो मादी छावाही पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असल्याचे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एकाच वेळी सिंहाच्या तीन छाव्यांचा जन्म होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यामुळे वैज्ञानिक पद्धतीने प्राणी व्यवस्थापन, संवर्धन, प्रजनन आणि सर्वोच्च दर्जाची पशुसंवर्धन सेवा देण्याबाबतची आमची बांधिलकी अधोरेखित होते. अशा घटनांमुळे लुप्त होत चाललेल्या प्रजातींच्या संवर्धनास चालना मिळते. – अनिता पाटील, संचालिका, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान