
अभिनेता प्रभासचा द राजा साब हा चित्रपट सपशेल आपटला आहे. प्रत्येक चित्रपटासाठी प्रभास हा अदमासे १०० ते १५० कोटी मानधन घेतो. या मानधनाइतका देखील गल्ला या चित्रपटाने अद्याप कमावला नाही. त्यामुळेच प्रभासची जादू ओसरली की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट समाधानकारक कमाई करु शकला नाही. समीक्षकांसह प्रेक्षकांनी देखील या चित्रपटावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. मूळातच द राजा साबची पटकथा ही लक्ष वेधून घेणारी नसल्याने, प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. प्रभासच्या या चित्रपटाने गाजावाजा फार मोठा केला होता. परंतु यातील सर्व हवा ही अवघ्या पाच दिवसात गेली.
चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल सांगायचे झाल्यास, पेड प्रिव्ह्यूमध्ये ₹९.१५ कोटी आणि पहिल्या दिवशी ₹५३.७५ कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी ₹५३.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ₹१९.१ कोटी आणि चौथ्या दिवशी ₹६.६ कोटी कमावले. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘द राजा साब’ने मंगळवारी, रिलीजच्या पाचव्या दिवशी ₹४.८५ कोटींची कमाई केली. यासह, पाच दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई आता ₹११९.४५ कोटींवर पोहोचली आहे.
कमाईचा हा आलेख पाहता ‘द राजा साब’ची प्रदर्शनानंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये घसरगुंडी झाली आहे. ३०० कोटींचे बजेट असलेल्या हा चित्रपट प्रभासच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लाॅप मानला जात आहे. याआधी त्याचे राधेश्याम आणि आदिपुरुष हे चित्रपट देखील फ्लाॅप ठरले होते.




























































