
रणवीर सिंगचा सुपरहिट चित्रपट “धुरंधर” अजूनही चर्चेत आहे. पण या धुरंधरच्या त्सुनामीमध्ये एक मराठी चित्रपट मात्र चांगलाच गाजला. मुख्य म्हणजे या चित्रपटाने बजेटपेक्षा पाचपट कमाई करत स्वतःच्या अस्तित्वाची दखल घेण्यास प्रेक्षकांना भाग पाडले. हा चित्रपट आहे. “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” आता मराठी शाळा पुन्हा भरणार या घोषवाक्यासह प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ 11 दिवसांत त्याच्या बजेटच्या अनेक पट कमाई करून इतिहास रचला. मुख्य म्हणजे या चित्रपटाचा विषय हा भावनिक आहेच. शिवाय सामाजिक भान जपणारा विषय असल्याने, प्रेक्षकांनीही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाने अतिशय उत्तम विषयाला हात घालून, उत्तम सादरीकरण केले आहे.
“क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” ची कथा एका जुन्या मराठी माध्यमाच्या शाळेभोवती फिरते जी इंग्रजी भाषेच्या शाळांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. माजी विद्यार्थी आणि शिक्षक शाळा वाचवण्यासाठी एकत्र काम करतात. चित्रपटाचे बजेट हे केवळ 2 कोटी होते. पहिल्या आठवड्यामध्येच या चित्रपटाने तब्बल 6.14 कोटींची भरघोस कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने 5.14 कोटींची कमाई करत तिकीटबारीवर आपली जादू कायम ठेवली. अवघ्या 11 दिवसांमध्ये चित्रपटाने 9.25 कोटींचा नफा कमवला आहे. एकीकडे बाॅलीवूडचा धुरंधर तिकीटबारीवर अजूनही स्वतःचे स्थान निर्माण करुन आहे. त्या धुरंधरच्या त्सुनामीमध्ये आलेल्या “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” या चित्रपटाने मराठीसह हिंदी भाषिकांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
चित्रपटामध्ये भावभावना, विनोद तसेच जुन्या दिवसांची गुंफण उत्तम पद्धतीने मांडण्यात दिग्दर्शकाला यश आलेले आहे. चित्रपटामध्ये सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, कादंबरी कदम आणि हरीश दुधाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



























































