
आगामी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप अनिश्चिततेचे सावट पसरत चालले आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने सुरक्षेच्या नावाखाली सुरू केलेले राजकारण कायम ठेवत हिंदुस्थानात न खेळण्याचा आपला हट्ट कायम ठेवला आहे. त्यामुळे बीसीबी आणि आयसीसी यांच्यात तणावाचे वातावरण वाढतच चालले आहे.
मंगळवारी बीसीबी आणि आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱयांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत बांगलादेशच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम, उपाध्यक्ष शकावत हुसेन आणि फारुख अहमद, क्रिकेट संचालन समितीचे अध्यक्ष नजमुल आबेदीन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी उपस्थित होते, मात्र या चर्चेनंतरही बीसीबीने आपल्या भूमिकेत कोणताही बदल केला नाही.
बैठकीत बीसीबीने स्पष्ट केले की, सुरक्षेच्या कारणामुळे हिंदुस्थानात खेळण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार शक्य नाही. त्यांनी आयसीसीकडे सामने इतर देशात घेण्याचा विचार करण्याची मागणी केली. मात्र स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले असून त्यात बदल करणे शक्य नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सादर केलेल्या सुरक्षा अहवालानुसार, हिंदुस्थानातील धोका कमी ते मध्यम स्वरूपाचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या सुरक्षा तज्ञांनी केलेल्या या मूल्यांकनानुसार, हा धोका इतर मोठय़ा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांइतकाच असून बांगलादेशसाठी वेगळा धोका नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी बांगलादेश सरकारचे युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी हिंदुस्थानात टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी पोषक वातावरण नसल्याचा दावा केला होता. त्यांनी एका कथित सुरक्षा अहवालाचा हवाला देत बांगलादेशी खेळाडू आणि समर्थकांसाठी धोका असल्याचे सांगितले होते.
आसिफ नजरुल यांनी सुरक्षेबाबत तीन मुद्दे उपस्थित केले होते. मुस्तफिजूर रहमान संघात असल्यास धोका वाढू शकतो, बांगलादेशी समर्थकांनी राष्ट्रीय जर्सी परिधान केल्यास समस्या निर्माण होऊ शकते आणि हिंदुस्थानातील आगामी निवडणुकांमुळे सुरक्षेचा धोका वाढू शकतो, असा त्यांचा दावा होता.
दरम्यान, बीसीबी आणि बांगलादेश सरकार यांनी सामने श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी घेण्याची मागणी केली आहे. मात्र एका संघाच्या मागणीनुसार संपूर्ण जागतिक स्पर्धेचे नियोजन बदलता येणार नाही, अशी भूमिका आयसीसीने घेतली आहे.
टी-20 विश्वचषक 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. बांगलादेशला कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडीज, इंग्लंड, इटली आणि नेपाळविरुद्ध सामने खेळायचे आहेत, मात्र सध्याच्या वादामुळे या सामन्यांच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.



























































