
मकर संक्रांतीचा सण आज संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, यानिमित्ताने मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. मात्र, दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात यंदा मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ओवाळणीसाठी येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी तुळजाभवानी मातेला ओवाळण्यासाठी तुळजापूर शहर आणि परिसरातील महिलांची मोठी गर्दी होत असते. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने ओवाळणीसाठी येणाऱ्या महिलांना आधार कार्ड सोबत बाळगणे सक्तीचे केले आहे. आधार कार्ड दाखवल्याशिवाय महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे मंदिर संस्थानाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे प्रवेशाच्या नियमांत बदल झाला असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच, महिला भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने विशेष वेळेचे नियोजन केले आहे. बुधवारी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पुरुषांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली असून, हा एक तासाचा वेळ केवळ महिला भाविकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या काळात महिला शांततेत देवीचे दर्शन घेऊ शकतील आणि ओवाळणीचा विधी पूर्ण करू शकतील. एकीकडे दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तीमय वातावरणात तिळगुळाचा गोडवा पसरला असताना, तुळजापूरमध्ये शिस्तबद्ध दर्शनासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल चर्चेचा विषय ठरत आहे.


























































