
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देताना चारित्र्याचा निकष बाजूला ठेवत चारित्र्यहीन लोकांसाठी जणू वेगळेच आरक्षण ठेवले असल्याचा गंभीर आरोप मिंधे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. भाजपच्या उमेदवार निवडीवर त्यांनी जोरदार टीका करत अनेक धक्कादायक दावे मांडले आहेत.
धंगेकर यांनी म्हटले आहे की, भाजपचा प्रचार प्रमुखच जर महापालिकेच्या टेंडरमधील पैसा डान्सबारमध्ये उडवत असेल, तर त्या पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची, असा प्रश्न निर्माण होतो. तिकीट मिळालेल्या उमेदवारांची चारित्र्याची पातळीही याच दर्जाची असल्याचा टोला त्यांनी लगावला.
प्रभाग क्रमांक 12 मधील भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करत, हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघातील भाजप आमदारांचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले आहे. या आर्थिक व्यवहारांमधून कमावलेल्या पैशातून बारबालांसाठी स्वतंत्र ‘कोटा’ राखून ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
संस्कृतीच्या गप्पा मारणारे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि नेते चंद्रकांत पाटील यांनी या प्रकारावर खुलासा करावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. भाजपमध्ये अशा चारित्र्यहीन लोकांसाठी नेमक्या किती जागा राखीव आहेत, हे जनतेसमोर मांडावे, असे आव्हान त्यांनी दिले.
“असो, तो भाजप आहे. अशाच गोष्टींमुळे तो ‘पार्टी विथ डिफरन्स’ ठरतो,” असा खोचक टोला लगावत रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.




























































