निवडणूकीसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या

प्रशासनाकडून 321 मतदान केंद्रे संवेदनशील घोषित

महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पोलिंग पार्टीदेखील रवाना झाल्या आहेत. नागपूर महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. महानगरपालिकेत मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता शहरात 3004 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून त्यापैकी 321 केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. नागपूर शहरात एकूण 38 प्रभाग आहेत, ज्यात 37 प्रभाग हे 4 सदस्यीय, तर एक प्रभाग 3 सदस्यीय आहे. नागपूरकरांना एकूण 151 नगरसेवक निवडायचे आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता शहरात जवळपास 16 हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत, तर 5 हजार पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.

अमरावतीतील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे

अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी 87 जागांसाठी एकूण 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. अमरावतीकरांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन अमरावती महापालिकेचे ब्रँड अॅम्बेसेडर अभिनेता भारत गणेशपुरे यांनी केले. मतदान केंद्रावर जाऊन स्वच्छ प्रतिमा असणाऱया चांगल्या उमेदवाराला मतदान करावे. आपल्या परिसराचा विकास व्हावा, आपला परिसर स्वच्छ असावा यासाठी मतदानाच्या माध्यमातून स्वच्छ उमेदवाराला मतदान करा, असे भारत गणेशपुरे यांनी मतदार राजाला आवाहन केले आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत एकूण 22 प्रभागांत 661 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 22 पैकी 21 प्रभागांत एकूण चार उमेदवारांना निवडून द्यायचे आहे, तर केवळ वडाळी प्रभागात तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

नांदेडमध्ये 600 मतदान केंद्रांवर 3400 कर्मचारी

नांदेड महापालिकेसाठी उद्या, गुरुवारी मतदान होत असून उद्या होणाऱया मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. नांदेडमध्ये एकूण 20 प्रभाग असून यात 81 जागांसाठी एकूण 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शहरात एकूण 5 लाख 1 हजार 799 मतदार हा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उद्या सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. एकूण 600 मतदान केंद्रांवर 3400 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

सांगलीत निवडणुकीसाठी 527 मतदान केंद्रे सज्ज

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. या तिन्ही शहरांच्या महापालिकेसाठी एकूण 20 प्रभागांत 78 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी 381 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 527 मतदान केंद्रे आहेत. सांगली, मिरज आणि पुपवाड महानगरपालिकेसाठी एकूण 4 लाख 54 हजार 430 मतदार आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावतील. या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस यंत्रणेकडून घेतली जात आहे.

जालना निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

जालना महापालिकेसाठी पहिल्यांदा निवडणूक होत आहे. ही निवडणूक एकूण 291 मतदान केंद्रांवर पार पडणार आहे. उद्याच्या महापालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालन्यात 515 पोलीस कर्मचारी आणि 42 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. जालना महापालिकेसाठी 350 कंट्रोल युनिट, तर 1 हजार 400 बॅलेट युनिट असणार आहेत. जालन्यात 65 जागांसाठी 454 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 302 वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार असून 152 उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जालन्यात जास्तीतजास्त मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.