
महानगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया कशा प्रकारे सुरू आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी बऱ्याचदा उमेदवार मतदान केंद्रावर फेऱ्या मारतात. यामुळे काहीवेळेस मतदान केंद्रावर काम करण्यास अडचणी निर्माण होतात. हे लक्षात घेता उमेदवाराला दिवसभरात एखाद्या मतदान केंद्रावर तीन वेळाच जाण्याचे बंधन राज्यातील बहुतांश महानगरपालिका क्षेत्रात घालण्यात आले आहे.
मतदानाच्या दिवशी उमेदवाराला कोणत्याही मतदान केंद्रावर दिवसभरातून फक्त तीन वेळेसच जाता येईल. यापेक्षा अधिक फेऱ्या मारता येणार नाहीत. मतदानाच्या ठिकाणी तीन मतदारांनी मतदान करण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढय़ाच वेळापर्यंत प्रत्यक्ष मतदान कक्षात थांबता येईल, असे उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई वगळता राज्यात सर्वत्र प्रभाग पद्धती असल्याने मतदान करण्यास मतदारांना अधिकचा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांच्या मतदान केंद्रावरील भेटीवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिंग एजंटवर निर्बंध
मतमोजणी पेंद्रांवर बसण्यासाठी जागेची मर्यादा आहे. त्यामुळे प्रभाग पद्धती असलेल्या ठिकाणी संपूर्ण पॅनेलसाठी मिळून नोंदणीकृत राजकीय पक्षाने एकच पोलिंग एजंट नियुक्त करावा, अशा सूचनाही निवडणूक विभागाकडून संबंधित पालिका क्षेत्रांत देण्यात आल्या आहेत.
मोबाईल नेण्यास बंदी
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघात आणि मतदान केंद्राच्या आत भ्रमणध्वनी नेण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. तसेच वृद्ध आणि दिव्यांग मतदार भ्रमणध्वनी सोबत आणणार असतील तर त्यांना तो बंद करणे व मतदान केंद्राच्या आत जाण्याअगोदर त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडे सुपूर्द करणे बंधनकारक असेल.
























































