भाजप उमेदवाराच्या पतीकडून शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक, धुळ्यात मतदानापूर्वी राडा; तरुणाचे अपहरण

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी काही तास शिल्लक असतानाच आज राजकीय वातावरण चांगलेच तापले. देवपुरात प्रभाग दोन-ड मध्ये शिंदे गटाचे उमेदवार ऋषीकेश मोरे यांच्या घरावर सायंकाळी पाचच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. या घटनेत घरासमोर असलेल्या खुर्च्या, खिडक्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत काही महिला जखमी झाल्या असून हल्ला करणाऱ्यांनी एका तरुणाचे अपहरण केले असून हल्लेखोर भाजप उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे असल्याचा आरोप शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केला आहे.

देवपुरातील प्रभाग क्रमांक दोन-क मध्ये शिंदे गटाकडून ऋषीकेश मोरे उमेदवार आहेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांचे पुतणे आहेत. मोरे यांच्या घराच्या आवारात मतदानासंबंधी पूर्वतयारी करण्यात येत होती. त्याचवेळी सायंकाळी पाचच्या सुमारास ऋषीकेश मोरे यांच्या घरावर काहींनी हल्ला केला. घराच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. दगड-विटांचा मारा करण्यात आला. दगड-विटा फेकल्याने मोरे यांच्या घराच्या खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी साक्षी मोरे हिने देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.   

भाजपला मतदान केल्यास धुळ्यातील गुंडगिरी संपण्याऐवजी वाढणार

आम्ही निवडणुकीच्या कामात होतो. निवडणूकसंबंधीची माहिती देण्यासाठी मी आमदार मंजुळा गावित यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मुलीचा पह्न आला आणि तिने भाजपच्या विलास शिंदे आणि समर्थकांनी दगडफेक केल्याची माहिती दिली. भाजपचे गुंड उमेदवारांच्या घरात दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक करुन गेले आहेत. भाजपच्या हातात सत्ता दिली तर गुंडगिरी वाढेल, असे मनोज मोरे म्हणाले. भाजपने दिलेले उमेदवार गुंड प्रवृत्तीचे आहेत. भाजपला मतदान केल्यास धुळ्यातील गुंडगिरी संपण्याऐवजी वाढणार आहे, असे मनोज मोरे यांनी स्पष्ट केले.