
पालक पनीरचा वास येतो या कारणावरून झालेल्या भेदभावाविरुद्ध कायदेशीर लढा देणाऱ्या दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी अमेरिकेत मोठा विजय मिळवला आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर या विद्यापीठातील भारतीय पीएचडी विद्यार्थी आदित्य प्रकाश आणि उर्मी भट्टाचार्य यांनी पालक पनीरशी संबंधित भेदभावाच्या घटनेवरून दाखल केलेल्या नागरी हक्कांच्या खटल्यात दोन लाख डॉलर्स, म्हणजेच सुमारे १.८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळवली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर येथे आदित्य प्रकाश आणि त्यांची पत्नी उर्मी भट्टाचार्य पीएचडीचे शिक्षण घेत होते. सप्टेंबर २०२३ मध्ये ते आपल्या विभागात मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करत होते. एका कर्मचाऱ्याने जेवणाच्या वासाचे कारण देत त्यांना तिथे जेवण गरम करण्यास मज्जाव केला. हा फक्त अन्नाचा वास आहे. मी जेवण गरम करून लगेच निघून जात आहे, असे आदित्य यांनी स्पष्ट केले होते. मात्र या साध्या संवादाचे रूपांतर मोठ्या वादात झाले.
आदित्य आणि उर्मी यांनी या भेदभावाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर विद्यापीठाने त्यांच्यावरच सूडबुद्धीने कारवाई सुरू केल्याचा आरोप करण्यात आला. उर्मी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या टीचिंग असिस्टंट पदावरून काढून टाकण्यात आले. तसेच त्यांच्यावर दंगल भडकवल्याचा धक्कादायक आरोपही ठेवण्यात आला. या प्रकरणी दोघांनी कोलोराडो येथील युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये विद्यापीठाविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला.
अखेर विद्यापीठाने नमते घेत सप्टेंबर २०२५ मध्ये या दोघांना १.८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आणि त्यांना मास्टर्स पदवी प्रदान करण्याचे मान्य केले. मात्र या तडजोडीनुसार त्यांना भविष्यात या विद्यापीठात शिक्षण घेण्यास किंवा नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हे दाम्पत्य नुकतेच हिंदुस्थानात परतले आहे.
























































