
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्ही सर्व कुटुंबीयांनी एकत्रितपणे मतदान केले आहे. जिथे-जिथे निवडणुका होत आहेत, तिथल्या सर्व मतदारांना मी आवाहन करतो की, त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि आपल्या देशातील लोकशाही जिवंत ठेवावी. मात्र, मला एका गोष्टीचे वैषम्य वाटते, असे ते म्हणाले. सकाळपासून मुंबईसह इतर ठिकाणांहून फोन येत असून, निवडणूक प्रक्रियेत गोंधळ सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. बोटावरील शाई पुसली जात असल्याचेही सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयुक्त नेमका कसला पगार घेतात, याचा आता खुलासा झाला पाहिजे.”
नऊ वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे. मग गेली नऊ वर्षे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग नेमके काय करत होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यापुढे निवडणूक आयुक्तांनी दररोज आपण काय काम केले, याची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक केले पाहिजे. अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बसवले गेले पाहिजेत, जेणेकरून वर्षभर हे लोक नेमके काय करतात, हे तरी कळेल.
निवडणूक याद्यांमधील घोळ तातडीने थांबवला गेला पाहिजे किंवा त्यासाठी जबाबदार असलेल्या निवडणूक आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.





























































