
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून 600 मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदानाचा वेग हा थंडीमुळे कमी होता. मात्र दुपारी एक नंतर मतदानाला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 41.65 टक्के एवढे मतदान झाले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 81 उमेदवारांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. प्रशासनाने या मतदानाची जय्यत तयारी सुरु केली. तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मतदान जनजागृती अभियान राबवले. महापालिकेसाठी एकूण 5 लाख 1 हजार 799 मतदार असून, शहरात एकूण 20 प्रभाग आहेत. त्यातील 19 प्रभागात चार उमेदवार तर शेवटच्या 20व्या प्रभागात पाच उमेदवार असे 81 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. निवडणुकीसाठी जवळपास साडेतीन हजार कर्मचारी नेमण्यात आले होते. तर तीन हजार पोलीस कर्मचारी ज्यात होमगार्डचा देखील समावेश आहे.
सुरुवातीच्या दोन तासात तरोडा, सांगवी, हनुमानगड, भाग्यनगर, गणेशनगर, जयभीम नगर, शिवाजीनगर, नवामोंढा, दत्तनगर, हैदरबाग, उमर कॉलनी, चौफाळा, इतवारा, होळी, वजिराबाद, गुरुद्वारा, खडकपुरा, वसरणी, सिडको, वाघाळा या प्रभागातील मतदारांनी साडेनऊ वाजेपर्यंत 7.16 टक्के अर्थात 35 हजार 951 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी थंडीमुळे मतदानाला फारसा वेग नव्हता. मात्र 11.30 वाजेपर्यत मतदानाचा हा आकडा 17.14 टक्क्यापर्यंत पोहंचला. एकूण 86 हजार 5 मतदारांनी आपले मतदान नोंदवले. दुपारी दिड वाजेपर्यंत मतदानाची हि टक्केवारी 29.50 टक्क्यांपर्यंत पोहचली. एकूण 1 लाख 48 हजार 41 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
दुपारनंतर ही टक्केवारी 41.65 टक्क्यांपर्यंत पोहचली. एकूण 2 लाख 9 हजार 25 मतदारांनी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या.






























































