
निवडणूक आयोगाच्या बेफिकीर कारभाराचा आणि भोंगळ नियोजनाचा फटका केवळ मुंबईकर मतदारांनाच बसला नसून निवडणूक कर्मचाऱ्यांचेही हाल झाले. काही ठिकाणी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना नाश्ता मिळाला नाही, तर पुढे जेवण मिळाले नाही. काही ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय नव्हती. विशेषतः पश्चिम उपनगरातील मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
मालाड येथील पुरार भागात मतदानाचा जोर अधिक होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण होता. तिथे कर्मचाऱ्यांना नाश्ता आणि दुपारचे जेवणही मिळाले नाही. अखेर विभागीय अधिकाऱ्यांनी स्वतःच ती सोय केली. अनेक कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मतमोजणी उद्याच असल्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्रभर त्या-त्या ठिकाणी थांबावे लागले. मात्र, अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे चांगली नव्हती. आंघोळीची सोय नव्हती. काही ठिकाणी रात्रीचे जेवण न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना हॉटेलमधून ऑर्डर करावे लागले.
उपनगरात बऱ्याच ठिकाणी मैदाने आणि सोसायट्यांच्या आवारात तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या वऱ्हांड्यात उघड्यावर मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या कोणत्याही पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याने कर्मचाऱ्यांचे हाल झाले. आयोगाकडून कर्मचाऱ्यांना जी जेवणाची पाकिटे पोहोचविण्यात आली होती ती खाण्यासाठीसुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे मतदान केंद्रावर एका कोपऱ्यात बसून जेवण उरकावे लागल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या.
दुबार मतदाराकडून घेतले प्रतिज्ञापत्र
दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मधील मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी शिवाजी पार्कमधील मतदान केंद्रावर दुबार महिला मतदाराला शोधून काढले. या महिलेचे नाव दुबार यादीत होते. त्यामुळे या महिला मतदाराला थांबवण्यात आले आणि दुसऱ्या मतदान पेंद्रावर जाऊन मतदान करणार नाही असे प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावर या महिलेला मतदानाचा हक्क बजावण्यास परवानगी देण्यात आली.
गुप्तहेर रजनी पंडित यांचे नावच मतदार यादीतून गायब
मतदार यादीतील नावांवरून अनेक ठिकाणी गोंधळ सुरू होता. पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित आणि त्यांच्या कुटुंबातील पाच जणांची नावेच मतदार यादीतून गायब झाली होती. मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी त्या दोन वेगवेगळ्या मतदान पेंद्रांवर फिरल्या, पण यादीत नाव सापडले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील पाच जणांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला.
शिवाजी पार्क परिसरातील बालमोहन शाळेतील मतदान केंद्र तसेच कोहिनूरमधील महापालिकेच्या पार्किंग आणि महापालिकेच्या वुलन मिल शाळेतील मतदान केंद्रांवर प्रचंड गोंधळ होता. अनेक मतदारांची नावे यादीतून गायब होती.






























































