अंधेरी पश्चिम, वर्सोवा, चारकोप परिसरातील मतदान केंद्रांबाहेर रांगा

अंधेरी पश्चिम, वर्सोवा आणि चारकोप विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून आला. सर्व मतदान केंद्रांबाहेर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारच्या सुमारास काही काळ गर्दी कमी झाली होती. मात्र सायंकाळी पुन्हा एकदा मतदारांची मोठी गर्दी झाली.

अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर, आझाद नगर, भवन्स कॉलेज, चार बंगला, म्हाडा कॉलनी, गुलमोहर कॉलनी, नेहरू नगर आदी भागांत मतदानाचा चांगला उत्साह होता. वेल्फेअर असोसिएशन शाळा, मुंबई पब्लिक स्कूल, आरामनगर क्रमांक २, सेंट अँथनी हायस्कूल आदी मतदान केंद्रांवर दुपारपर्यंत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. काही ठिकाणी खुल्या मैदानावर मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, अंधेरी पश्चिमेकडील काही मतदान केंद्रांवर शिस्तीचा अभाव दिसून आला. कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक ते गांभीर्य नव्हते. काही कर्मचारी, पोलीस आणि होमगार्ड मोबाईलमध्ये मश्गुल असल्याचे चित्र होते. त्यांच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन अनेक जण मतदान केंद्रात खुलेआम ये-जा करीत होते. मतदान केंद्रांवरील अशा बेशिस्त कार्यपद्धतीमुळे बोगस मतदानाला मोकळे रान मिळाले असावे, अशी भीती सजग मतदारांनी व्यक्त केली.

मतदानाचा हक्क हुकला

दहिसर कांदरपाडा येथे वास्तव्यास आलेल्या गीता गिरानी (५०) यांनी कांदिवली येथून येथे स्थलांतर केल्यानंतर आधार कार्डवरील पत्ता अद्ययावत केला होता. मात्र मतदानासाठी आल्या असता त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी त्यांना मतदान न करताच माघारी परतावे लागले.