
वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्याने आलेला भारी ‘फील’… ईव्हीएम मशीन बघण्याची उत्सुकता… त्यातच पालिकेसाठी मतदान करण्याचा मिळालेला हक्क… यामुळे पहिल्यांदाच मतदान करत असलेल्या नवमतदारांनी ‘अठरावं वरीस मतदानाचं’ असे म्हणत मतदानाचा हक्क बजावला. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात मतदान केंद्र शोधण्यासाठी धावपळ करावी लागल्याने तरुणाईने नाराजी व्यक्त केली.
ठाणे, पालघर, पनवेलमधील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर सकाळपासूनच तरुणांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाईने स्वतः तर मतदान केलेच शिवाय मित्र-मैत्रिणींनाही प्रोत्साहित केले. मतदान केल्यानंतर बोटावर लावलेल्या शाईचा सेल्फी काढत त्यांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक व ट्विटरवर पोस्ट केले. काही नवमतदार आणि तरुणाईने कुटुंबासोबत मतदान केंद्रावर जाऊन हा आनंद व्यक्त केला; तर काहींनी मित्रमैत्रिणींसोबत एकत्रित जाऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडले. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावताना आनंद होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
वसईत ५०० मतदारांची नावे गायब
वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे गायब असल्याचा आरोप बविआचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेत विविध ठिकाणच्या भागात गोंधळ निर्माण झाले असल्याचे सांगितले. वसई पश्चिमेच्या मर्सेस येथील प्रभाग क्रमांक १९ मध्ये ५०० मतदारांची नावेच गायब असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली तेव्हा ५०० नावे होती मात्र आता ती नावेच गायब असल्याचा त्यांनी आरोप केला.
मुंब्यात महिलेचे मतदान कर्मचाऱ्याने केले
मुंब्यातील मानसी कांबळे फायर ब्रिगेडजवळील मतदान केंद्र क्रमांक ३३ मध्ये मतदान करण्यासाठी केंद्रामध्ये गेल्या असताना मशीनमधील चारपैकी दोन बटणे व्यवस्थित दाबली गेली, पण अन्य दोन बटणे दाबली जात नव्हती. त्यामुळे कांबळे यांनी येथील कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली. त्यांनी पुन्हा बटण दाबा असे सांगितले. मात्र असे करूनदेखील बटणे दाबली जात नव्हती. अखेर हा कर्मचारीच स्वतः मतदान यंत्राजवळ आला आणि बटण कसे दाबायचे हे कांबळे यांना सांगत असताना स्वतःच दोन बटणे दाबून हा कर्मचारी तेथून पसार झाला.
साडेपाचनंतर मतदान न करून दिल्याने गोंधळ
वसई- नालासोपारा पूर्वेच्या जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर पाच ते सहा वेळा ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मात्र साडेपाच वाजून गेल्यानंतर त्या ठिकाणी मतदान करू न दिल्याचा आरोप करत नागरिकांनी जोरदार गोंधळ घातला. प्रभाग क्रमांक १९ चे पेल्हार जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्र आहे. त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाल्यापासून अधूनमधून ईव्हीएम यंत्रात गोंधळ झाल्याचे प्रकार समोर येत होते. त्यामुळे अनेक मतदारांना त्याठिकाणी ताटकळत उभे राहावे लागले तर काही जण गर्दी बघून मतदान न करताच माघारी परतले.































































