
कांदिवली प्रभाग क्रमांक २९ मधील एका मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व तटस्थ असणे अपेक्षित असताना राजकीय पक्षाच्या अॅपचा वापर होत असल्याने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
शिवसेना–मनसेचे स्थानिक उमेदवार सचिन पाटील यांनी व्हिडीओ शेअर करत हा प्रकार उघडकीस आणला. सचिन पाटील म्हणाले की, “कांदिवली प्रभाग क्रमांक २९ येथे मुंबई महापालिकेने जे अधिकारी नेमले आहेत, त्यांचे मुख्य काम मतदारांची नावे शोधणे हे आहे. यासाठी महापालिकेचे स्वतंत्र अॅप्लिकेशन असतानाही संबंधित अधिकारी भाजपचे तसेच येथील स्थानिक उमेदवारांचे अॅप वापरून मतदारांची नावे शोधून देत आहेत. अशा प्रकारे सरकारी अधिकारीच भाजपचा प्रचार करत आहेत. याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
गोरेगावात बॅलेट युनिट बदलण्याची वेळ
गोरेगाव पश्चिम प्रभाग क्रमांक ५८ मधील स्टेलर स्कूल या मतदान केंद्रावर सकाळी तांत्रिक बिघाडामुळे बॅलेट युनिट बदलण्याची वेळ आली. बॅलेट युनिटवरील बटण व्यवस्थित कार्यरत नसल्याच्या काही मतदारांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर तात्काळ बॅलेट युनिट बदलण्यात आले.
आरे कॉलनीत एकाच्या नावावर दुसऱ्याचे मतदान
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील मयूर नगर परिसरात एकाच्या नावावर दुसऱ्याने बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अली अन्सारी नामक व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर गेली असता, आपल्या नावावर आधीच दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.






























































